जागतिक स्ट्रोक दिवस: 29 ऑक्टोबर 2022

@maharashtra.city

मुंबई: आहाराच्या चुकीच्या सवयी, अनियमित व्यायाम आणि धकाधकीचे जीवन अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, स्ट्रोकमुळे कायमचे अपंगत्व किंवा अचानक मृत्यू ओढावू शकतो. केईएम रूग्णालयांमध्ये दर महिन्याला 240 पेक्षा जास्त स्ट्रोकचे रूग्ण आढळून आले आहेत, ज्यामध्ये बहुसंख्य रूग्ण तरुण वयोगटातील आहेत.

यावर बोलताना केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) स्ट्रोक युनिट प्रमुख डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही वर्षांपासून, ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली असून तरुण वयोगटातील रुग्णांची संख्या अलीकडेच वाढली आहे. बदलती जीवनशैली, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि मधुमेह मेलिटस, उच्च रक्तदाब आणि विस्कळीत लिपिड प्रोफाइल ही स्ट्रोकमागची कारणं आहेत. 

स्ट्रोक म्हणजे मेंदूचा झटका (brain attack) आणि हे देशातील अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे. हे त्याच्या/तिच्या वयाची पर्वा न करता कोणालाही आणि कुठेही होऊ शकते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह यांसारख्या इतर एनसीडीच्या बाबतीत जागरुकता नक्कीच आहे. परंतु, स्ट्रोकच्या (stroke) लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि नंतर लोक स्वतःच अडचणीत येतात. स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंगसाठी जाणे अत्यावश्यक आहे. त्वरित उपचार स्ट्रोकशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात, अशी प्रतिक्रिया डॉ चंद्रनाथ तिवारी, न्यूरोसर्जन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी व्यक्त केली. 

गोल्डन विंडो पीरियड म्हणजे, स्ट्रोकची लक्षणे जाणवल्याच्या पहिल्या काही तासांच्या आत (4.5 ते कमाल 24 तासांपर्यंत) जर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर दीर्घकालीन मेंदूची हानी टाळता येते. लक्षणे ओळखून वेळेवर आणि लवकर निदान केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. ज्या रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला आहे त्यांनी दररोज व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, मधुमेहावर लक्ष ठेवणे, वेळेवर औषधं घेणे आणि मीठाचे सेवन मर्यादित करणे, असेही डॉ डांगे यांनी स्पष्ट केले.

वॉकेथॉनमधून गोल्डन अवरमध्ये रुग्णाला आवश्यक उपचार देण्याचा संदेश :

इंडियन ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या १९९०-२०१९ च्या अभ्यासानुसार देशभरात सर्वाधिक मृत्यू हे मेंदूशी निगडित आजारांमुळे होत आहे. पक्षाघाताच्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असल्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने  जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने २९ ऑक्टोबरला, शनिवारी सकाळी ग्लोबल रुग्णालयाच्यावतीने मरीन ड्राईव्हला एअर इंडिया ते एनसीपीएपर्यत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

ग्लोबल रुग्णालयातील न्युरोलॉजी, स्ट्रोक, आणि न्यूओक्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. शिरीष हस्तक यावेळी म्हणाले की, पक्षाघाताच्या रुग्णामध्ये विशेषत: अक्युट इसेमिक स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये आजाराचे निदान आणि उपचार वेळेत न मिळाल्यास अपंगत्व किंवा मृत्यूचा असतो. पक्षाघात ही आपत्कालीन स्थिती असून यामध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे आहे. ‘बी फास्ट’ या वाक्याच्या माध्यमातून नागरिकांना पक्षाघाताची लक्षणे लक्षात ठेवणे आणि अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने उपचार घेण्यास मदत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here