By जयु भाटकर

@maharashtracity

आज १२ जून. अवघ्या मराठी सारस्वतावर-रसिकांवर आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ लेखक, श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या आदरणीय पु. ल. चा २१ वा स्मृतिदिन. याच दिवशी २००० साली पु. ल. हे जग सोडून गेले.

पुलना ६ जूनला पुण्यात डेक्कन जिमखान्याच्या परिसरातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना न्यूमोनियाचा त्रास होता. पुढच्या एक दोन दिवसात ‘‘पुल हॉस्पिटलमध्ये आहेत’’ हि बातमी सर्वत्र पसरली.

मी रोज ठाणे-पुणे येऊन जावून असल्यामुळे ८ जूनला मी ठाण्यात घरी होतो. पुणे दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक श्री. सतीश सानेनी फोन केला. ‘‘पुलं हॉस्पिटलमध्ये आहेत, कव्हरेज-बातमी-यासाठी ताबडतोब पुण्यात ये.” मी संध्याकाळी पुण्यात पोहोचलो. सर्वच माध्यम, संस्था, यंत्रणांना पहिली बातमी आपल्यालाच मिळायला हवी हा एक अलिखित रिवाज. यामुळेच प्रयाग हॉस्पिटलच्या बाहेर पत्रकार – चॅनेल – प्रतिनिधी – रिपोर्टर – कॅमेरान तळ ठोकून होते. त्या मिडिया गर्दीत पुणे दूरदर्शन चित्रीकरण युनिट घेऊन मी ही होतो.

पु. ल. च्या आजारपणाची बातमी सर्वत्र पसरली. त्यांचे अगणित चाहते – उभ्या राज्यातून पुण्यात प्रयाग हॉस्पिटलच्या बाहेर झुंडीने येऊ लागले. सर्वसामान्य मराठी रसिकांपासून नामवंत कलावंत, साहित्यिक, लेखक, लोकप्रतिनिधी, मंत्री सार्‍यांची गर्दी वाढत होती. साधारण तीन-चार तासाच्या अंतराने प्रयाग हॉस्पिटलच्या व्हरांड्यात डॉ. शिरीष प्रयाग पत्रकार – माध्यम प्रतिनिधीनींना माहिती देत होते.

काही अतिउत्साही चॅनेल प्रतिनिधी वेळी-अवेळी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा नाईलाजाने दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी त्यांना खडे बोल सुनावले. ‘‘इकडे पुल मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तुम्ही कधी एकदा बातमी मिळतेय यासाठी गडबड -गोंधळ करत आहात?’’

दिवसागणिक पुलंची प्रकृती खालावत होती. पत्नी सौ. सुनिताबाई धीरोदात्तपणे पुलंच्या शेजारी बसून होत्या. हॉस्पिटलमधून जाता-येता त्यांना जवळून पाहता आलं. अकरा जूनला हॉस्पिटल परिसरात खूपच गर्दी झाली. पोलिसांना गर्दी आवरणं कठीण झालं. राज्य सरकारनं पु. ल.च्या आजारपण-उपचार या सर्वांवर लक्ष टेवण्याची जबाबदारी तेव्हाचे आरोग्य राज्यमंत्री श्री. एकनाथ गायकवाड यांच्यावर सोपवली होती. ते पुण्यात तळ ठाकून होते. पुलंंचा मानसपुत्र, सुनीताबाईंचा भाचा दिनेश अमेरिकेहून निघाला ही बातमीसुद्धा मिडियाला मिळाली.

मंगळवार १२ जूनचा दिवस उजाडला. हॉस्पिटलच्या बाहेरची गर्दी वाढत होती. साधारण अकरा वाजता पोलिसांकडून मेसेज आला. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पुलंना पहाण्यासाठी मुंबईहून निघालेत. पोलिसांची धावपळ सुरु झाली. हॉस्पिटल परिसरात गर्दी वाढत होती. सकाळी डॉ. शिरीष प्रयागनी ‘‘पुलंंची प्रकृती गंभीर आहे.’’ असं मिडियाला सांगितलं होतं. एकूणच कुठल्याही क्षणी ‘‘ ती बातमी येईल’’ अस धीरगंभीर वातावरण होतं. सगळे चॅनेलप्रतिनिधी त्या गर्दीत जागा मिळेल तिथे उभे राहून लाईव्ह रिपोर्टींग करत होते. मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाचा संपादक श्री. समीरण वाळवेकर वार्तांकनासाठी उपस्थित होता. दुपारी १२ वाजल्यानंतर हॉस्पिटल परिसरात अभूतपूर्व गर्दी झाली.

चिंताग्रस्त – काळजी वातावरणात गर्दीमुळे पुणे पोलिसांची जणू ती कसोटीची वेळ होती. साधारण सव्वा वाजता पोलीस यंत्रणेकडून पुन्हा निरोप आला.‘ ‘मा. बाळासाहेब ठाकरे बालेवाडीपर्यंत पोहोचले आहेत.’’ पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात त्यांच्या वाहनांचा ताफा हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. मा. बाळासाहेबांना विशेष झेड प्लस सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी हॉस्पिटलचं मेन गेट लावून घेतलं. गेट समोरची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या गर्दीतल्या प्रत्येक चेहर्‍यावर चिंता काळजी आणि पुलप्रेमाची छटा होती. प्रत्येकजण आपापल्या परीने चर्चा करत होता. चार-पाच दिवस डेरेदाखल पत्रकार-वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हॉस्पिटलसमोरच्या टपरीवरचा चहा रिचवत तिथ तासनतास उभे होते. तिथून कुणी हलत नव्हता. कारण ‘‘ ती बातमी’’ केव्हावी येऊ शकते. ती मिळायला हवी.

बरोबर १ वाजून ३५ मिनिटांनी श्री. जब्बार पटेलांनी प्रयाग हॉस्पिटलच्या व्हारांड्यात येऊन जोरात हाक दिली. ‘‘प्रेस’’ आणि हातानेच सर्वांना जवळच येण्याची खूण केली. त्यांच्या शेजारी डॉ. शिरीष प्रयाग येऊन उभे राहिले. क्षणभर निरव शांतता आणि पुढच्या क्षणी डॉ. शिरीष प्रयागांच्या मुखातून पहिल वाक्य निघालं ‘‘फ्रेडस्, सॉरी, मिस्टर पी. एल. देशपांडे नोमोव्हर!’’ बस्स, प्रेसच्या भाऊगर्दीत उभ्या असणार्‍या माझ्याही मनात धस्स झालं. आपल्या घरातलं कुणीतरी गेल्याची जाणीव झाली. श्री. जब्बार पटेलांनी सर्वांना गर्दी कमी करण्याचं विनम्र आवाहन केलं. पुढच्या काही मिनिटातच मा. बाळासाहेब ठाकरेंचं हॉस्पिटलमध्ये आगमन झालं.

नियती किती विचित्र असते. काही मिनिटांचा फरक पडला होता. मा. बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच पुलंंनी अखेरचा श्‍वास घेतला होता. शेवटी मा. बाळासाहेब ठाकरेंना पुलंच्या पार्थिवाचं दर्शन घडलं. प्रयाग हॉस्पिटलमध्ये मा. प्रकाश जावडेकर (आताचे केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री), श्री. उल्हासदादा पवार ही मंडळी सकाळपासूनच होती. प्रयाग हॉस्पिटलच्या बाहेर गर्दीतले अनेकजण ओक्साबोक्सी रडत होते. श्री. उल्हास पवारांनी मला बोलावलं. मी संचालक श्री. सतीश सानेना सोबत घेतले. श्री. पवार, श्री. जावडेकर साहेब पुढील तयारीबद्दल बोलू लागले. दूरदर्शन बातम्या- चित्रीकरण – थेट प्रसारण हा संदर्भ होता.

श्री. उल्हास पवार म्हणाले, ‘‘ उद्या अंत्यसंस्काराचं स्मशानभूमीतून थेट प्रसारण व्हायला हवं.’’ मी सांगितलं ‘‘हा निर्णय दूरदर्शन मुख्यालयच घेऊ शकतं.’’ श्री. प्रकाश जावडेकर साहेबांनी ताबडतोब श्री. गोपिनाथजी मुंडे साहेब, श्री. नितीन गडकरी साहेब यांना फोन लावला. त्यांच्यामार्फत त्यावेळचे माहिती प्रसारणमंत्री श्री. प्रमोद महाजन साहेबांना पुल निधनाचा निरोप पोहोचला.

पुढच्या अर्ध्या तासात दिल्लीहूनही सूत्र-यंत्रणा हलली. मा. प्रमोद महाजन साहेबांचे खाजगी सचिव श्री. विवेक मैत्राचा श्री. गोपिनाथ मुंडे साहेबांमार्फत निरोप आला. स्व. पु. लंं. च्या अंत्यसंस्काराचे थेट प्रसारण वैकुंठ स्मशानभूमितून होईल. तशा सूचना दिल्लीहून प्रसारण मंत्रालय – दूरदर्शन महानिदेशालयाकडून मुंबई दूरदर्शनला दिल्या गेल्या आहेत.

साधारण तीन वाजता मुंबई दूरदर्शनचे संचालक श्री. मुकेश शर्मांचा श्री. सतीश सानेना फोन आला. ‘‘सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारण होतेय. रात्री उशीरापर्यंत प्रसारण ओ. बी. व्हॅन, इतर सर्व स्टाफ पुण्यात पोहोचेल. ओ. बी. व्हॅन पार्किंग, कॅमेरा पोझिशन याची व्यवस्था पाहावी, मी स्वत: येतोय.’’

इकडे मुंबईत राज्य शासनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील हे जाहीर केलं. पुणे जिल्हाधिकारी, महसूल, पोलीस, महानगरपालिका सारीच यंत्रणा कामाला लागली. तेव्हाचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. शमसुद्दीन मुश्रीफ यांना भेटलो. त्यांनी महानगरपालिका अधिकार्‍यांची भेट घालून दिली. बंदोबस्तावरील पोलीस, ट्राफिक पोलीस यांची दूरदर्शनला सर्वच मदत मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे रात्री अकरावाजेपर्यंत स्मशानभूमीत थेट प्रक्षेपणाच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता झाली.

मुंबईहून आलेली दूरदर्शन स्टाफ टीम श्री. कृष्णकांत कुदळेच्या पथिक हॉटेलमध्ये रात्री बारा वाजता पोहोचली. अभियंता श्री. चंद्रशेखर हुपरीकरनी स्मशानभूमीत जाऊन पुणे महानगरपालिकेच्या क्रेनच्या सहाय्याने मायक्रोव्हेव डिश, सॅटेलाईट सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली. पहाटे दोन वाजता श्री. मुकेश शर्मा (संचालक) हॉटेल पथिकवर पोहोचले. थेट प्रक्षेपणाची सर्व तयारी झाली आहे. याबाबत दोघांचं बोलणं झालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं या सगळ्या धावपळीत ‘‘मी पथिक हॉटेलमध्ये स्मशानभूमीत दोन वेळा चकरा मारुन येऊन तसाच शर्ट पॅन्टवर झोपलो होतो.’’

रात्री उशीरा स्व. पु. लंं. चा मानसपुत्र, सुनीताबाईंचा भाचा दिनेश ठाकूर विमानतळावर पोहोचला. तिथून पुण्यापर्यंत त्यांना आणण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी आपल्या विशेष अधिकारात पोलीस एस्कॉर्ट उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे पहाटे दिनेश ठाकूर वेळेत पुण्यात पोहोचला.

बुधवार १३ जून. पहाटे साडेपाच वाजता खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राची, लाडक्या पु. लं. ची अखेरची प्रवास यात्रा सुरु झाली. ६ वाजता प्रयाग हॉस्पिटलमधून ऍब्युलन्समधून पु. लंं. चं पार्थिव भंडारकर रोडवरच्या मालती-माधव निवासस्थानी आणण्यात आलं. सुनीताबाईंच्या सूचनेप्रमाणे वृत्तपत्र आणि चॅनेलवर स्व. पुलंचा चेहरा (पार्थिवाचा) फोटो असणार नाही याच तंतोतंत पालन करण्यात आलं. सहा वाजता कडक पोलीस बंदोबस्तात हॉस्पिटलमधून घरी निघालेल्या ऍम्ब्युलन्सच लॉंग शॉट मध्येच बहुतांशी चॅनेल प्रतिनिधींना चित्रीकरण करावं लागलं. सकाळी ६ वाजल्यापासून मालती-माधवमध्ये पुलंच्या पार्थिवाचे दर्शन सुरु झालं. १० वाजेपर्यंत हजारोजणांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं. संपूर्ण भांडारकर रोडवर पुलप्रेमींचे हुंदके ऐकू येत होते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून पुलंचे हजारो चाहते आपल्या लाडक्या आदरणीय व्यक्तिमत्वाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्या शोकाकुल वातावरणात आम्ही दूरदर्शनसाठी काही मान्यवराच्या प्रतिक्रिया चित्रीकरण (रेकॉॅर्डिंग) सुरु केलं.

संचालक सतीश साने साहेब मला म्हणाले, ‘‘मी प्रतिक्रिया देतो’’, कॅमेरामन श्री. अरुण मोरेनी कॅमेरा ऑनची खूण केली. श्री. सानेसाहेब बोलू लागले. जेमतेम एक वाक्य बोलले आणि ते ओक्साबोक्सी रडू लागले. पुढे त्यांना बोलताच येईना. भांडारकर रोडने त्या दिवशी पुलंच्या जाण्यात दु:खाचा महापूर अनुभवला. बरोबर दहा वाजता पुलंच पार्थिव घेऊन मालती-माधव मधून ऍम्ब्युलन्स निघाली. पुढे मागे पोलीस गाड्या इतर गाड्या शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा निघाली. वैकुंठ स्मशानभूमीकडे.

इकडे वैकुंठ स्मशानभूमीत दूरदर्शन इंजिनिरींग टीम सकाळी सात वाजता पोहोचली होती. विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होणार होते. थेट प्रणारणाचं सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करत होता. अकरा वाजता सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणाला सुरुवात झाली. सुरुवातीला सुधीर गाडगीळच निवेदन-प्रास्ताविक-आदल्या दिवशीचे चित्रीकरण, सकाळी केलेलं चित्रीकरण, असं प्रसारण सुरु झालं. या सगळ्या गडबडीत आमची प्रॉडक्शन कंट्रोल रुम (तात्पुरत्या स्वरुपाची) विद्युत दाहिनीच्या शेजारी आम्ही तयार केली होती. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. शासकीय इतमामातल्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार सुरु होते. पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना दिली गेली. स्मशानभूमीत अभूतपूर्व गर्दी होती. साध उभं रहायला जागा नव्हती. अनेक मान्यवर, व्हीआयपी मिळेल त्या ठिकाणी दाटीवाटीने उभे होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात महाराष्ट्राचं लाडकं दैवत स्व. पु. लं. देशपांडेचं पार्थिव विद्युत दाहिनीत विसावलं. एक महापर्व संपलं.

व्यथित मनानं मी प्रॉडक्शन कंट्रोल रुममधून प्रसारणाची शेवटची सूचना दिली. थेट प्रसारण संपल्याची ती संकेत सूचना होती. प्रसारण संपलं होतं. मी मागे वळून पाहिलं. माझ्या पाठीमागे त्या गर्दीत आमच्या दूरदर्शनच्या कॅमेरा मोठ्या बॉक्सवर बसलेली ती महान व्यक्ती बघून मी उडालोच. क्षणभर स्तंभितच झालो. ते महान व्यक्तीमत्व होते आदरणीय श्री. पंडित भिमसेन जोशीजी. मी कृतार्थपणे नमस्कार केला. त्यांचा गहिवरलेला चेहरा अश्रू लपवू शकत नव्हता. समाजाल्या प्रत्येक माणसाच्या हृदयसिहासानवर, लहानापासून थोरापर्यंत -पुल आदराने विराजमान झाले होते.

या सगळ्या गडबड धावपळीत एक मोठी तांत्रिक चूक झाली. ज्यामुळे दूरदर्शनच्या थेट प्रक्षेपणाचा बहुतांशी भाग रंगीत न दिसता कृष्णधवल दिसला. (ब्लॅक ऍण्ड व्हाईट) चूक अशी होती – आमची प्रॉडक्शन कंट्रोल रुम आणि विद्युत दाहिनी यामध्ये जी भिंत होती ती विद्युत दाहिनीच्या आगीच्या उष्णतेमुळे प्रचंड गरम झाली होती. भिंतीला लागूनच दूरदर्शन यंत्रसामुग्री, प्लेबॅक मशिन, रेकॉर्डर, स्वीचर असल्यामुळे त्या उष्णतेचा परिणाम या यंत्रसामुग्रीवर झाला. परिणामी स्वीचर लॉक झाला. त्यामुळे थेट प्रसारण कृष्णधवल दिसलं. आज २१ वर्षांनी हे सारं आठवलं. चार दिवसांपूर्वी डॉ. शिरीष प्रयाग आणि स्व. सुनीताबाईंचे बंधु सर्वोत्तम ठाकुरांशी फोनवर बोललो. दोघंही गहिवरुन बोलत होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आयुष्यात गतकाळच्या स्मरणीय घटना, प्रसंग, मनात वेळी-अवेळी रुंजी घालतात. कधी अस्वस्थ करतात. म्हणून हा लेखनप्रपंच.

आदरणीय स्व. पु. लं. देशपांडे सर, अवघ्या मराठी सारस्वताला तुम्ही हसवलंत -रिजवलंत. प्रत्येक मराठी माणसाला तुम्ही आपल्या अलौकीक विनोबुद्धीने जगण्याचं बळ दिलंत. विनोदी वेगळ्या शैलीचा साहित्य आणि वक्तृत्व श्रवणाचा आनंद दिलात. तमाम मराठी जगत आणि ही महाराष्ट्र भूमी तुमची कायम ऋणी आहे. ऋणी राहिल. आदरणीय पु. ल. सर तुम्हाला विनम्र अभिवादन!

जयु भाटकर
(माजी सहाय्यक संचालक)
मुंबई दूरदर्शन
मोबा. : ९८६९५६७८७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here