ऑक्सिजन साठा, लसीकरण, कामगारांचे आरोग्य यावर उद्योगांनी राज्य शासनाला दिली ग्वाही

@maharashtracity

मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स (Task Force) स्थापन करावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले. कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोव्हिड काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोव्हीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन (Oxygen production), साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण (vaccination), निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या (CII) पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक (Uday Kotak), निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani), हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी (Baba Kalyani), बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदि उद्योगपती सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.

उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.

छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे

यावेळी बोलतांना डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या लाटेत २० लाख रुग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत दोन तीन महिन्यातच ४० लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी जास्त असू शकतो. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहेत.

केंद्राकडून २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

उद्योगांच्या प्रतिनिधींनी देखील कोव्हिडच्या या साथीत राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे तसेच उद्योगांच्या परिसरात कोव्हिड सुसंगत वर्तणूक राहील याची काळजी घेण्याची खात्री दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here