सरपंच भदाणेंचा शिवसैनिकांना इशारा

जि. प. सदस्या शालिनी भदाणेंवरील शाईफेक विरोधात महिलांचा मोर्चा

@maharashtracity

धुळे: धुळे तालुक्यातील बोरकुंड गटातील जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी महिलांनी मोर्चा काढून, या पुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

या मोर्चात जि. प. सदस्या शालीनी भदाणे, बाळासाहेब भदाणे, खा. डॉ. सुभाष भामरे, जि. प. अध्यक्षा अश्‍विनी पाटील, शिवसेना शिंदे गटाचे मनोज मोरे, संजय गुजराथी, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, डॉ. माधुरी बोरसे, बापू खलाणे, संजय वाल्हे, विरेंद्रसिंग गिरासे, रामकृष्ण पाटील, शंकर खलाणे, भाऊसाहेब देसले, भदाणे समर्थक शिवसैनिक, भाजपचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या जि. प. सदस्या शालिनी भदाणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली होती. या निवडणुकीत भदाणे यांनी तटस्थ राहून भाजपाला मदत केल्याचा आरोप करुन त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी शालिनी यांच्या अंगावर शाई फेकून त्यांच्या निषेक केला होता. या प्रकरणी शालिनी भदाणे यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हाही दाखल झाला.

तथापि, सोमवारी शालिनी भदाणे यांच्या समर्थनार्थ बोरकुंड गावातील ग्रामस्थांसह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पांझरा नदीकिनाराहून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात महिलांनी काळ्याफीती लावल्या होत्या. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले, त्यात म्हटले आहे, की धुळे तालुक्यातील बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या पत्नी जि. प. सदस्या शालिनी भदाणे यांनी निवडणुकीवेळी तटस्थ भूमिका घेतल्याने त्यांच्यावर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करुन शाई फेकली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवून अशा प्रकारे कृत्य करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा घटनांमुळे सभ्य महिला यापुढे राजकारणात येणार नाही.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, धुळे तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून तरूण मित्राला संधी मिळवून दिली. या सर्वबाबी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवून आम्ही केल्या आहेत. त्याच अनुषंगाने पुढच्या घडामोडी झाल्या आहेत. त्याला अनुसरूणच आम्ही दुसर्‍या दिवशी जि. प अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीत तालुक्याचा विकास व्हावा, या हेतूने तटस्थ राहण्याची भुमिका घेतली. परंतु, आधीच अविचाराराने बाधित झालेल्या लोकांनी निमित्त साधत पत्नी शालिनी भदाणे आणि जि.प सदस्या अनिता पाटील यांच्यावर हल्ला करीत शाई टाकली. महिलांचा आदर करण्याची शिकवण बाळासाहेबांनी शिवसैनिकाना दिली असताना त्यांनी असला प्रकार केला. या पुढे जर कोणी असे केले तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here