दहा किलोमीटरचा परिसर स्फोटाने हादरला; 13 जण गंभीर जखमी

By Milind Mane

Twitter: @milindmane70

महाड: महाड औद्योगिक वसाहतीत मल्लक स्पेशालिटी या कलर बनवणाऱ्या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजता स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करणारे १३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दहा किलोमीटरचा परिसर हादरला. या आगीमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्र व आजूबाजूच्या गावात धुराचे लोट पसरून संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशलिटी या प्लॅन्टमध्ये कलर बनवण्याचे उत्पादन घेतले जाते. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या कंपनीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर पाठोपाठ पाच स्फोटांनी संपूर्ण परिसर व आजूबाजूची चार गावे हादरून गेली. संपूर्ण एमआयडीसीमध्ये धुराचे लोट व आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण एमआयडीसीत काळा धूर पसरला होता.

मल्लक स्पेशालिटी या कंपनीच्या बाजूला असणाऱ्या जिते, टेमघर, देशमुख कांबळे, बिरवाडी, नागलवाडी फाटा पर्यंत एवढेच काय तर महाड शहरापर्यंत या स्फोटांनी रहिवासी भागात मोठे हादरे बसले.

या स्फोटामुळे संपूर्ण परिसर प्रदूषित झाला असून महाड एमआयडीसीमधील पोलिसांनी व प्रशासनाने आजूबाजूच्या गावांचे रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत. या केमिकल्सच्या पांढरा धुराने नागरिकांचे कपडे प्रदूषित झालेत व शरीरावर निळ्या कलरचे आच्छादन पसरले होते. या धुरामुळे व हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. तर अनेकांच्या तोंडाची चव या स्फोटामुळे गेली आहे.

उद्योग मंत्री व पालकमंत्री अपयशी?

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून आज पाच महिन्याचा कालावधी लोटला. या काळात केवळ महाड एमआयडीसीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रिव्ही, श्रीहरी, लक्ष्मी ऑरगॅनिक, प्रसोल या कंपन्यांमध्ये मागील काही दिवसात स्फोट झाले. त्याची दखल उद्योग खात्याने पर्यायाने औद्योगिक सुरक्षा यंत्रणा यांनी घेतली नाही. त्यामुळे आज मल्लक स्पेशालिस्ट कंपनीत महाभयंकर स्फोट झाला, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सामंत रायगडचे पालकमंत्री की अलिबागचे?

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री झाल्यापासून आज पाच महिन्याचा कालावधी लोटला. रायगड जिल्ह्यात 15 तालुके कार्यरत असताना त्यांनी केवळ अलिबाग येथेच अधिकाऱ्यांच्या भरोशावर राहून बैठका पार पाडल्या आहेत. त्या ठिकाणी भेट देणारे व उपस्थित असणारे अधिकारी केवळ थातूरमातूर उत्तरे देऊन पालकमंत्र्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नक्की काय चालू आहे, याची इत्यंभूत माहिती प्रशासनाला पर्यायाने पालकमंत्र्यांना देत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

केवळ आढावा बैठक घेऊन सोपस्कार पार पाडत असल्याने सर्व अधिकारी व प्रशासन मुजोर झाल्याची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे.

मल्लक कंपनीच्या स्फोटात मल्लक कंपनीबरोबर बाजूच्या प्रिव्ही ऑरगॅनिक, श्रीहरी केमिकल्स, केव्हा या कंपनीतील 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे. संतोष जाधव (वय वर्षे 40), मोहन देशमुख (43), निशांत जाधव (28), भावेश बालकिया (३५), नितीन पाटील (41), राम (50), राजेश तिवारी (60), सत्यरंजन पनराव (26), सुनील काटे (49), संदेश घरत (44, अरुण इरळे (38), शत्रुघन पास्वान (25), अजित पासवान (23). या व्यक्ती गंभीर जखमी असून यातील किरकोळ जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना मुंबई येथे नेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here