By Milind Mane

महाड: महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अधिकृत व अनधिकृत जंगलतोड चालू असून या जंगलतोडीला वनाधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे महाड व पोलादपूर या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगलामध्ये अनधिकृत कोळसा भट्ट्या व्यवसाय करणाऱ्यांनी कहर केला असल्याचे चित्र दिसत असतानाही वनाधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. त्याचा विपरीत परिणाम जंगलातील हिस्त्र नरभक्षक प्राण्यांनी आपला मोर्चा रहिवासी क्षेत्राकडे वळविला आहे.

महाड व पोलादपूर तालुक्याचे वनविभागाचे कार्यालय महाड येथे असून या कार्यालयातूनच दोन तालुक्यांचा कार्यभार पाहिला जातो. मात्र दोन तालुक्यांच्या सीमा या रत्नागिरी, सातारा व पुणे जिल्हा हद्दीला जोडल्या गेलेल्या आहेत.
महाड व पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पसरलेली आहे. या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खाजगी तसेच वनखात्याच्या मालकीची जंगले कार्यरत आहेत. मात्र, दरवर्षी महाड येथील वनविभागाच्या कार्यालयातून जंगलतोडीला मोठ्या प्रमाणावर परवानगी दिली जात आहे.

त्याचबरोबर वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा छुपा आशीर्वाद असल्याच्या संशयामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जंगलतोड होत असते. अनधिकृत जंगलतोड करून त्याची रातोरात विक्री जवळील रत्नागिरी, सातारा व पुणे या जिल्ह्यात होत आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्यासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. त्यामुळे पूर्वी झाडीने बहरलेला राष्ट्रीय महामार्ग आता उघडा बोडका झाला आहे. त्याचबरोबर जंगलातून माती उत्खननाचे प्रमाण वाढल्याने वनसंपदेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

जंगलातील वन्य प्राण्यांचे आश्रयाचे स्थान असणारे जंगल आता पूर्णपणे नष्ट झाल्याने नागरी भागात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर हिस्त्र प्राणी उदाहरणार्थ बिबट्या वाघ, जंगली रान डुक्कर, त्याचबरोबर जंगलातील वानरांनी देखील आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. या जंगलातील वन्य प्राण्यांचे भक्ष पूर्णपणे संपल्याने महाड तालुक्यातील जंगलाजवळील गावात मुक्तपणे बिबट्या वाघांचा संचार वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीत वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याने केवळ खबरदारीचा उपाय म्हणून वनखात्याकडून जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र दुसरीकडे अनधिकृत जंगलतोड करणाऱ्यांना वन खात्याचा पाठिंबा असल्याशिवाय ते जंगलतोड करतात का? असा सवाल महाड, पोलादपूर या दोन भागातील नागरिक वनखात्याला विचारत आहेत.

महाड, पोलादपूर तसेच माणगाव या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे व फार्म हाऊसच्या नावाखाली व निवासी इमारत बांधण्याच्या कामासाठी जंगलतोड चालू आहे. वन्य प्राण्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी असणारे अन्न पूर्णपणे संपुष्टात आले असून त्यातच सकाळपासून लागणाऱ्या वनव्यांमुळे जंगलातील त्यांची आश्रयस्थाने पूर्णपणे नष्ट झाली आहेत. परिणामी ते मानवी वस्तीकडे मुक्त संचार करत आहेत.

महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगड वाडी, हिरकणी वाडी, परडी वाडी, नेवाळी वाडी, पाचाड, पुनाडे, करमर, खलई, शांदोशी, वारंगी, बावले, कावळे, छत्री निजामपूर, कोंझर त्याचबरोबर विनेरे विभागातील दक्षिण टोक, कुरले, नागाव, धावरे कोंड, नागाव काटे तळी रस्ता, कावळे कुंभार्डे रस्ता, उंदेरी कोंड मालुसरे, खुटील, मुर्शी, वरंध घाट, वाळनखोरे त्याचबरोबर महाड- दापोली रस्ता, पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोतवाल, गोळेगणी, कापडे, पैठण, पोलादपूर – वाई – सुरूर – महाबळेश्वर रस्ता, कशेडी घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यामुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा रहिवासी क्षेत्राकडे वळविला आहे.

महाड वनविभाग केवळ बिबट्यापासून बचाव होण्यासाठी जनजागृती अभियान राबवते. रात्रीच्या वेळेस ग्रामस्थांनी बाहेर पडण्यापासून काळजी घ्या, फार तर एखाद्या गावात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जातो. मात्र त्या पिंजऱ्यात बिबट्या कधी येणार? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे. केवळ बिबट्याला पळून जाण्यासाठी फटाके लावा, असा उपदेश वनाधिकारी ग्रामस्थांना देतात.
महाड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार चालू झाला आहे. त्याला जंगलातील नैसर्गिक वनस्पतीची होणारी बेसुमार जंगलतोड व तालुक्यातील कोंड रान, कोथुर्डे व कुंभार्डे, वाघोली, वडघर तसेच तालुक्यातील अनेक गावातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा भट्ट्या चालू असून या कोळशा भट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तर होत आहेत. परंतु, जंगलाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

महाड नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 200 च्या वरील हॉटेल व तंदूर भट्ट्या तसेच वीर पासून पोलादपूर पर्यंत महामार्गावरील सर्व धाबे व हॉटेल व त्यामधील तंदूर भट्ट्या यांना लागणारा कोळसा हा अनधिकृत जंगलतोड करून लावणारा कोळसा भट्ट्यांमधीलच वापरला जात आहे.

तालुक्यात जंगलात लागणाऱ्या अनाधिकृत कोळशांच्या भट्टीवाले. हे हॉटेल व्यवसायिक व तंदूर भट्टीवाले यांना बेसुमार कोळसा मुबलक प्रमाणात पुरवीत आहेत. हॉटेल व तंदूर भट्टी यांना लागणारा कोळसा कुठून येतो याची वनविभाग कधीही शहानिशा करत नाही. याबाबत महाड विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश शाहू यांना विचारले असता “तुम्ही याबाबत लेखी तक्रार करा, मग मी कारवाई करतो,” असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे न परवडणारा दगडी कोळशापेक्षा परवडणारा अनधिकृत जंगलतोडीतून स्वस्त्यात मिळणारा कोळसा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

महाड तालुक्यात जी जंगलामध्ये जंगलतोड चालू आहे. त्याला अधिकृत परवानगी दिली आहे, असे महाड वनविभागाचे वनक्षेत्रपाल राकेश शाहू यांनी सांगितले. मात्र, अधिकृत जंगल तोडीच्या पाठीमागे अनधिकृत पणे जंगलतोड करून त्या अनाधिकृत जंगलतोडीचा निर्माण झालेली लाकडे ही अधिकृतपणे परवानगी घेतलेल्या जंगलतोडीमध्ये मिसळून त्याची विल्हेवाट लावण्याचे पद्धतशीरपणे काम हे जंगल ठेकेदार करीत आहेत. याला महाड वनविभागाचे छुपे समर्थन आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ थातूरमातूर एखाद्या आदिवासीवर व कातकरी बांधवांवर कारवाई करून मोकळे व्हायचे व मोठ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा न उगारता त्यांना गोंजारण्याचे काम इमाने इतबारे करीत असल्याचे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here