अनधिकृतपणे जुनी वाहने केली जात आहेत नष्ट!

गोदामांवर काम करणाऱ्या कामगारांचे भवितव्य अंधारात ?

By Milind Mane

Twitter: @milindmane70

महाड: भंगार व्यावसायिकांकडून शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात असून याकडे पोलिसांसह संबंधित विभागातील प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यवसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची मोडतोड करत असून याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकंदरीत भंगार गोडाऊन रहिवासी क्षेत्रात असल्याने रहिवासी क्षेत्रातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत आहे. तर गोरगरिबांच्या जीवावर भंगार व्यवसायिक गलेलठ्ठ झाले आहेत. भंगार गोळा करणारे व्यावसायिक अनधिकृतपणे वाहनांची तोडकाम करणे, रासायनिक कचरा घेणे, घरगुती सिलिंडरचा वापर जुन्या गाड्या तोडण्यासाठी करणे, आदी कामे बिनधास्तपणे करत आहेत. परप्रांतीय असलेल्या या भंगार व्यवसायिकांकडून कामगारांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यातून भंगार व्यावसायिक आणि कामगार याठिकाणी आपला तळ ठोकून आहेत. औद्योगिक क्षेत्र तसेच महाड शहरात या व्यावसायिकांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादातून जागा भाडे तत्वावर घेवून व्यवसाय उभे केले आहेत. मात्र या ठिकाणी कोणतीच खबरदारी घेतली जात नसून संबंधित शासकीय अधिकारी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आहेत.

महाड शहरात किमान सहा ते सात भंगाराचे गोदामे आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गावर हे व्यावसायिक असून या गोदामांवर शहर तसेच ग्रामीण भागातून गोळा करून आणलेले भंगार स्वीकारले जाते. बहुतांश परप्रांतीय नागरिक या व्यवसायात असून ग्रामीण भागात भंगार घेवून आईस्क्रीम, भांडी, कपडे दिले जातात. तर शहरात रोख रक्कम देवून भंगार खरेदी केले जाते. या भंगार व्यवसायिकांकडून गोळा करून आणणाऱ्या व्यक्तीकडून कमी पैशात भंगार घेवून विक्री मात्र बाजारभावाप्रमाणे केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरिबांच्या पोटावर भंगार व्यवसायिक मात्र गलेलठ्ठ झाले आहेत.

ज्या भाड्याच्या जागेत हि गोदामे आहेत, त्या ठिकाणी इमारत नसताना देखील आणि कागदपत्रांचा पत्ता नसताना देखील वीज वितरण कंपनीमार्फत पुरवठा करण्यात आला आहे. हा वीज पुरवठा करताना देखील महावितरणकडून लाकडी काठ्यांचा आधार देत वीज पुरवठा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय महाड नगरपालिकेकडून एक प्रकारे भंगार व्यावसायिकांना शहरातील जागा व त्यांचे मुक्तहस्ते परवाने देण्याचे काम नगरपालिका कोणाच्या आशीर्वादाने करते असा अहवाल नागरिक विचारत आहेत. या भंगार व्यावसायिकांच्या गोदामांवर पाणीपुरवठा देखील करण्याचे काम ग्रामीण व शहरी भागातील प्रशासकीय यंत्रणेकडून केला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला कामे करताना शासकीय नियमांची आडकाठी समोर येते. मात्र, या भंगार व्यावसायिकांना कशा परवानगी आणि सोयीसुविधा दिल्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाड शहरात असलेल्या प्रमुख मार्गांच्या शेजारीच भंगार व्यावसायिकांची गोदामे आहेत. या भंगार गोदामांवर आणि परिसरात अस्वच्छ वातावरण आहे. जागोजागी पडलेले भंगाराचे तुकडे, ड्रम, जुन्या टाक्या, आदीमुळे डेंग्यूचा प्रसार होण्यास व डास वाढण्यास मदत होते. एकीकडे महाड नगर पालिका आरोग्य विभाग सर्वसामान्य नागरिकाच्या घरात किंवा घराशेजारी ठेवलेल्या कुंडीत अगर ड्रममध्ये पाणी साचून ठेवल्यास त्याच्यावर कारवाई करते. मात्र, भंगार गोदाम व्यावसायिक गलिच्छ वातावरणावर निर्माण करतात, त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. याचठिकाणी भंगार गोदामावर काम करणारे कामगार देखील राहतात. औद्योगिक क्षेत्रात तर रासानिक ड्रम, रासायनिक पावडरच्या पिशव्या साठवून ठेवल्या जातात. या पिशव्या किंवा ड्रम हे कामगार असुरक्षितपणे हाताळतात. यामुळे अनेक अपघात व आग लागण्याच्या घटना देखील वारंवार होत आहेत.
भंगार व्यवसायिकांनी साठवून ठेवलेल्या गोदामातील अनधिकृत रासायनिक व क्रूड ऑइलच्या साठ्यामुळे या परिसरात रसायन सांडून जमिनीची सुपीकता आणि शेती धोक्यात आली आहे. असे असताना देखील जागा मालकाशी करार करून कोणत्याच प्रकारची शासकीय परवानगी न घेता या भंगार व्यावसायिकांनी तळ ठोकले आहेत.

भंगार गोदामावर अनधिकृतपणे वाहनांची तोड

बहुतांश भंगार व्यावसायिकांकडून जुनी वाहने भंगार म्हणून घेतली जातात. परिवहन विभागाची रीतसर परवानगी न घेताच वाहन मालक देखील आपली वाहने भंगार व्यावसायिकांना देतात. भंगार व्यावसायिक देखील परिवहन विभागाच्या कोणत्याच परवानग्या न काढता आपल्या कामगारांकडून वाहन तोडून नष्ट करतात. जुने वाहन नष्ट झाले असले तरी संबंधित विभागाकडे मात्र या वाहनांची नोंद कायम राहते. या नंबर प्लेटचा वापर देखील केला जाण्याची शक्यता असते. प्रत्येक महिन्याला शहरात परिवहन विभागाचा कॅम्प असून देखील आर.टी.ओ. कडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. भंगार व्यावसायिकांकडून होत असलेल्या अनधिकृत कामांची तपासणी करून कारवाई होणे आवश्यक आहे.

महाड तालुक्याच्या शहरी भागात व महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भंगाराच्या गोडाऊनमध्ये विद्युत् मंडळाचे निकामी झालेले व चोरून आणलेले विद्युत पोल तसेच भारत दूरसंचार निगमचे दूरध्वनीचे खांब, जे ॲल्युमिनियमचे असतात व त्याचा तळ बीडचा असतो, असे पोल देखील खेडोपाड्यातून गोळा करून त्याची तोडमोड करून ते भंगारात काढले जाण्याचे काम सुरू आहे. असे असताना ही भारत संचार निगमचे व विद्युत मंडळाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने भंगार माफीया यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. महाड तालुक्यातील भारत संचार निगमचे जुने पोल 99 टक्के भंगारात विकले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here