@maharashtracity

By विजय साखळकर

मन्या सुर्वे हाती लागल्यावर त्याला पॅरोलवर असताना फरार झाल्याबद्दलची केस सुरू झाली. त्याच्यावरील गुन्हा शाबीत झाल्याने त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात (Yerwada jail, Pune) करण्यात आली. इथंच मन्याचा हाडवैरी माहिमचा पोत्या उर्फ सुहास भाटकरही होता. दोघेही एकमेकांवर  दात खाऊन होते. रोजच्या रोज कारागृहात त्यांच्या मारामाऱ्या होत असायच्या. साहजिकच या दोघांना इथं ठेवणे कारागृहातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरली. त्यामुळे मन्याला (Manya Surve) अन्य कारागृहात हलविण्याची विनंती केली गेली आणि ती मान्य करण्यात येऊन मन्याला रत्नागिरी (Ratnagiri) येथील तुलनेने शांत असणा-या कारागृहात हलवण्यात आले.
रत्नागिरी येथील कारागृहात हलविण्यात आले हा बहुधा मन्याला आपला वैयक्तिक अवमान वाटला असावा. म्हणून त्याने तिथं उपोषणाला सुरुवात केली. काही खात- पित नसल्याने त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली. त्याला धड चालताही येईना अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याचा धिप्पाड देह अगदी काटकुळा झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती ढासळतच होती. त्याच्यासोबत दोन पोलिसही ठेवण्यात आले होते.
एके दिवशी सकाळी मन्या आपल्या काॅटवर नसल्याचे आढळून आले. मन्या पळाला ही गोष्ट उघड झाली. त्याची शोधाशोध सुरू झाली. मन्या त्यावेळी त्याच्या मूळ गावी गेला असेल असे समजून तेथे पाहणी करण्यात आली. पण मन्या सापडला नाही. त्याचा एक नातेवाईक त्या परिसरात राहायचा व त्याचा एका राजकीय पक्षाशी जवळीकीचा संबंध होता. त्यामुळे तेथेही शोध केला गेला. पण मन्या तिथंही सापडला नाही. हे फार मोठे आश्चर्य होते. ज्या मन्याला धड चालता येत नव्हते, तब्येत अर्ध्यापेक्षाही कमी झाली होती, तो गेला कुठे?
मग एकाएकी मन्या मुंबईत आला आणि जुन्या साथीदारांना घेऊन त्याने नवा खेळ सुरू केला. मन्याच्या घरासमोर पोलीस पहारा होताच. समोर राहणाऱ्या आल्सला त्याच्याकडून दगाफटका होऊ नये म्हणून त्याचीही काळजी घेतली जात होती‌. मन्या आणि त्याचे साथीदार आता  त्यांच्या कार्याची कक्षा वाढवत होते. पहिल्यानं फक्त प्रभादेवी, माहीम, दादर, परळ भागात धुमाकूळ घालून टोळी चालविणाऱ्या मन्या आणि त्याच्या टोळीने आपला व्याप पार नवी मुंबईपर्यंत (Navi Mumbai) वाढविला. कारण त्यानं गुन्ह्यांसाठी वापरलेल्या गाड्या नवी मुंबई भागात सोडून दिल्याचे आढळून आले.
मन्याची ही दुसरी इनिंग अत्यंत चोख सुरू झाली. तो राहायचा कुठे याविषयी अनेक अख्यायिका ‌ होत्या. काहींच्या सांगण्यानुसार पोत्या माहिमच्या एका दारूबारवाल्याला नडायचा. त्यानं पोत्याचा विरोधक असल्यामुळे प्लाझा सिनेमाच्या मागे त्याची राहायची व्यवस्था केली होती. पण पोलिसांनी शोध घेऊनही तो सापडत नव्हता.

सतीश राजे, पप्पी पाटील आणि अशोक मस्तकार यांच्याकडून लाखालाखाची खंडणी उकळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर मन्या अधिकच डेस्परेट झाला.
मन्याबाबत त्याच काळात त्याने प्लास्टिक सर्जरी केली होती की काय, अशी शंका प्रदर्शित होऊ लागली. कारण त्याच्याजवळ वावरलेले देखील त्याला ओळखू शकत नव्हते. मन्या सुर्वेनंतर सुमारे दहा वर्षानी झंझावात ठरलेला अमर नाईक (Amar Naik) वेषांतर करण्यात पटाईत होता. त्यानं प्लास्टिक सर्जरी करून चेहरेपट्टी बदलल्याची धारणा होती. पण मन्या दुसऱ्यांदा मुंबईत धुमाकूळ घालू लागला तेव्हा त्याने प्लास्टिक सर्जरी केली की काय अशी शंका निर्माण झाली होती. तो वेषांतर करूनही फिरायचा.
अशोक मस्तकार आणि मन्या सुर्वे हे दोघेही कीर्ती काॅलेजात होते. तेव्हा ते एकमेकांना ओळखत होते. अरबी पेहेराव करून तो समोर आला आणि बोलत होता, त्यावेळी त्यांनी त्याला ओळखला नव्हता. आवाजावरून त्यांनी ओळखला.
तीच गत सतीश राजे यांची…. सतीश राजे आणि मन्या येरवडा जेलमध्ये होते. एकमेकांना चांगले  ओळखत होते. तरीही ओळख दिल्यावर त्यांनी त्याला ओळखले. त्यावरून त्याने प्लास्टिक सर्जरी  (plastic surgery) केली असावी किंवा वेषांतराची कला कोळून प्यायली असावी असा निष्कर्ष काढता येतो. पण तसा काही ठोस पुरावा मिळत नाही.
मन्यानंतर पुढच्या दहा वर्षांनी जे कित्ते मुंबई अंडरवर्ल्डमधील (Underworld) काही सदस्यानी गिरवले त्याची  सुरुवात मन्यानं केली, असं मानता येईल.
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here