@maharashtracity

मुंबई: घाटकोपर ( पूर्व) येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना उंदराने त्याच्या डाव्या डोळ्याचा काही भाग कुरतडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महापौरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली व पाहणी केली. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये , यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

श्रीनिवास याच्या डोळ्याच्या खालील भागातून रक्त निघत असल्याचे पाहून त्याचे नातेवाईक हादरले. त्यांनी तात्काळ नर्स, डॉक्टर यांना पाचारण केले. त्याच्या डोळ्यांची नीटपणे तपासणी केली असता त्याच्या डाव्या डोळ्याचा भाग उंदराने कुरतडला असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी राजावाडी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी, या रुग्णालयात काही ठिकाणी उंदरांचा वावर असल्याचे मान्य करीत उंदरानेच डोळा कुरतडल्याचा निष्कर्ष काढला.

चौकशी व उपाययोजना करण्याचे आदेश

राजावाडी रुग्णालयात उंदराने रुग्णाच्या डोळ्याचा भाग कुरतडला असल्याची गंभीर घटना घडली असून आपण अधिष्ठाता डॉ.विद्या ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, या घटनेप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

  • महापौर किशोरी पेडणेकर

वास्तविक, अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजावाडी रुग्णालयात आयसीयू विभाग तळमजल्याला असून तेथे काही भागात उंदरांचा वावर असल्याचे सांगितले. रुग्णालय प्रशासनाने उंदरांचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रतिबंधित उपाययोजना केल्या आहेत. तरीही ही घटना घडल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून आणखीन कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.

यापूर्वीही महिला रुग्णांचे डोळे कुरतडल्याची घटना

पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने शताब्दी) रुग्णालयात ८ ऑक्टो २०१७ रोजी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शांता जाधव या महिलेच्या पायाला तर प्रमिला नेरूळकर या महिलेच्या डोळ्यांना उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here