भाजपा शिक्षक आघाडीची मागणी

Twitter: @maharashtracity

मुंबई: शाळांमधील सर्वच शिक्षकांना बीएलओच्या नियुक्त्या दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी असा प्रश्न शाळाचालकांना पडला आहे. या नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकविण्यासाठी पाठविले जाईल, असा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे (Anil Bornare) यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

दरम्यान, गुरुवारी तसेच शुक्रवारी चेंबूर व मुंबईच्या अनेक शाळांमधील सर्वच शिक्षकांना मुंबईतील सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदार केंद्रास्तरीय अधिकारी (Booth Level Officer – BLO) च्या नियुक्या स्वीकारण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकण्यात येत आहे. शाळेतल्या सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास शाळा कशी भरवावी, विद्यार्थ्यांना कुणी शिकवावे, असा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे.

याबाबत शुक्रवारी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (MLC Dnyaneshwar Mhatre) यांनी राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. चव्हाण यांनी लागलीच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले. तर अनिल बोरनारे यांनी जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले.

मुंबईतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शाळा दि १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश, ११ वी ऑनलाईन प्रक्रिया, पाठ्यपुस्तक वाटप, जुलै महिन्यात होणाऱ्या एसएससीच्या परीक्षांची कामे शाळा स्तरावर सुरू आहेत. त्यातच मुंबईतील विविध विधानसभा मतदार संघातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सर्वच शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्या दिल्या असून नियुक्त्या स्वीकारण्यासाठी मुख्याध्यापकांवर दबाव टाकला जात आहे.

मात्र बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ मधील कलम २७ अन्वये शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाच्या कामाव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे (non teaching work) देऊ नये असा उल्लेख असतांनाही शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपले जात आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here