शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या पुढाकाराने नवीन शाळा
विक्रोळीतील गरीब मुलांना मिळणार मोफत शिक्षण
नर्सरी ते इयत्ता सहावीपर्यन्त ३६० विद्यार्थ्यांना दिला ऑनलाईन प्रवेश
@maharashtracity
मुंबई: विक्रोळी ( पूर्व) टागोरनगर येथे पालिकेच्या एका भूखंडावर स्थानिक नागरिकांनी तीन वर्षात कचरा टाकून टाकून डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आणले होते. मात्र शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांना जेव्हा ‘तो’ भूखंड पालिकेने शाळेसाठी आरक्षित ठेवल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्या भूखंडाचा कचरा टाकण्यासाठी होणारा वापर थांबवला. तसेच, त्या जागेवरील शाळेच्या आरक्षणानुसार तेथे तळापासून पाच मजली ‘सीबीएसई शाळा’ उभारण्याची लाख मोलाची कामगिरी बजावली.
त्यामुळे आता विक्रोळी परिसरातील गरीब मुलांनाही खासगी शाळेत हजारो रुपये डोनेशन व फी भरून नर्सरी, ज्युनिअर व सीनिअर केजी, इयत्ता पहिली ते सहावीपर्यन्तचे शिकण घेण्याची गरज भासणार नाही. पालिकेने उभारलेल्या या नवीन शाळेत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे.

या नवीन शाळेचे उदघाटन शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या हस्ते व महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले.
याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, आमदार रमेश कोरगावकर, आ. सुनील राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर, “एस आणि टी ” प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बडे, शिक्षणाधिकारी महेश पालकर, “एस” विभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या विकासात पालिकेची भूमिका – राऊत
समाजामध्ये आज ज्या व्यक्ती विविध मोठया पदांवर काम करताना दिसत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांचे शिक्षण हे मुंबई महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन खा. संजय राऊत यांनी केले.

आदर्श विद्यार्थी घडविणार – महापौर
आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ असून त्याची शैक्षणिक जडणघडण ही चांगली होण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने महापालिकेने सुरु केलेल्या सीबीएसई शाळा त्याचे एक उदाहरण असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिपादन केले.
शाळा उभारणीचा अत्यानंद -: सुवर्णा करंजे
शिवसेनेचे युवा नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यामुळेच माझ्या विभागामध्ये पहिली सीबीएसई शाळा सुरू झाली याचा आपल्याला अत्यानंद झाला आहे, असे स्थानिक नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी सांगितले.
विद्यार्थी संख्या टप्प्याटप्प्याने वाढविणार
तळमजला अधिक पाच मजली या शाळेचे ५० हजार चौरस फूट बांधकाम करण्यात आले असून त्यामध्ये, नर्सरी ते सहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. एकूण ३६० विद्यार्थ्यांना ऑनलाईन, लॉटरीद्वारे प्रवेश देण्यात आले असून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.