प्रशिक्षणात लसीकरण शंकेचे निरसन करण्याचे धडे
आगामी दाेन दिवसात लसीकरणाला सुरुवात

@maharashtracity

मुंबई: मुंबई पालिका क्षेत्रात गर्भवतींना लसीकरण करण्याची जोरदार तयारी केली असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे प्रशिक्षण लस देण्याबाबतचे नसून लसीबद्दल गर्भवतीच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचे प्रशिक्षण असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. आगामी दोन दिवसात लसीकरणाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल असे ही सांगण्यात आले.

दरम्यान, आयसीएमआर व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबईतील गर्भवती महिलांच्या लसीकरणापूर्वी लसीबाबत इत्यंभूत माहिती फायदे यांची माहिती देण्यात येत आहे. शिवाय लस घेतल्यानंतर काही दिवस होणाऱ्या हलक्या त्रासाबाबत सांगितले जाणार आहेत.

संबंधित महिलेला माहिती याेग्य वाटल्यानंतरच लस दिली जाणार आहे. तर माहितीबाबत शंका असलेल्या महिलेला लस दिली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक वयातील नागरिकांचे लसीकरण हाेणे याबाबत पालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नात आहे.

टप्पाटप्प्याने लसीकरण सुरु असून १८ वर्षाच्या लाभार्थीनंतर आता पालिका प्रशासनाने गर्भवती महिलांचे लसीकरण करण्याबाबत तयारी सुरु केली आहे. यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण राज्याच्या आराेग्य विभागाकडून देण्यात आले.

यावर बोलताना पालिका कार्यकारी आराेग्य अधिकारी डाॅ. मंगला गाेमारे यांनी सांगितले की, गर्भवतींना लसीचा फायदा व त्यानंतर हाेणारा काही दिवस हलका त्रास याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातील लसीच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण हाेताच गर्भवती महिलांचे लसीकरणाचे काम सुरु हाेणार आहे. निरसन केल्या नंतर ही महिलांना काेराेना लसीकरणाबाबत शंका असल्यास त्या महिलांना लस दिली जाणार नसल्याचे डाॅ. गाेमारे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here