मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टीसाठी स्थिती अनुकूल
मुंबईत तुरळक ठिकाणी बुधवार रात्री पासून पाऊस

@maharashtracity

मुंबई: सुमारे तीन आठवड्याच्या काळाच्या विश्रांती नंतर पावसाला अनुकूल अशी वातावरणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यात मेघ गर्जेनेसह पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत तुरळक ठिकाणी बुधवारी रात्री पासून सुरु झालेला पाऊस गुरुवार पर्यंत बऱ्यापैकी झाला अशी नोंद आहे.

यावर बोलताना भारतीय हवामान शास्त्र विभाग मुंबई शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, मोठ्या विश्रांती नंतर मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरणीय लक्षण दिसत आहेत. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. शिवाय वातावरणाच्या वरील थरात अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात येत्या चार ते पाच दिवसात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. यात मेघ गर्जनेसह पावसाची अधिक शक्यता असल्याचे भुते यांनी सांगितले.

दरम्यान ९ ते ११ जुलै दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात विविध इशारे देण्यात आले आहेत. यात १० आणि ११ जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि ११ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यासाठी लक्षण बळकट असून मध्य महाराष्ट्रात देखील पर्जन्य वृष्टीचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. ११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाला सुरूवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here