Twitter: @maharashtracity
मुंबई: रेल्वे प्रवास करताना अनेक फुकटे प्रवासी प्रवास करतात. अशांवर कारवाई करण्याचे रेल्वे प्रशासनाकडून एक उद्दिष्ट देण्यात येत असते. मात्र हे उद्दिष्ट पार करुन मध्य रेल्वेने कोट्यवधीची कमाई केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या कार्याबद्दल प्रशासनाने ३५ तिकिट तपासणी कर्मचारी आणि ५ भाडे व्यतिरिक्त महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
दरम्यान, रेल्वे बोर्डाच्या २३५.३० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा मध्य रेल्वेने ३०३.९१ कोटी रुपयांचा तिकीट तपासणी महसूल मिळवला. या तपासणीत सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रथम स्थान मिळवले. पहिल्यांदाच कोणत्याही क्षेत्रिय रेल्वेने ३०० कोटी रुपयांचे महसूल मिळविल्याचे हे उदाहरण असल्याचे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेकडे तिकीट तपासणीतून करोड रुपये मिळविणारे सर्वाधिक कर्मचारी आहेत. दोन कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह एकूण २३ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एक करोड रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. टीटीआय धर्मेंद्र कुमार हे भारतीय रेल्वे मध्ये सर्वाधिक कमाई करणारे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.
सर्व विभागातील प्रत्येकी एक पाच सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने ८१.६६ कोटी रुपयांच्या रेल्वे बोर्डाच्या लक्षाच्या अनुरूप ८७.४४ कोटी रुपयांचा भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) महसूल मिळवला आहे आणि सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे.
मध्य रेल्वेने प्रथमच आपले भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) लक्ष्य गाठले आहे. या अनुकरणीय कार्यासाठी प्रत्येक विभागातील भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) विभागाचे प्रभारी वाणिज्य निरीक्षक यांचाही सत्कार करण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.