Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग (टीबी) रुग्णालयात प्रथमच, रुग्णांना उच्च-प्रथिने आहार पर्याय म्हणून मांसाहारी अन्न देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णाला चांगले प्रथिनेयुक्त जेवण देऊन आजार बरा होण्यास फायदा होणार आहे.
सन २०१४ मध्ये, महापालिकेने ७५० खाटांच्या शिवडी टीबी रुग्णालयातील रुग्णांसाठी जेवण तयार करण्याचे कंत्राट इंटरनॅशनल सोसायटी – फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ला दिले होते. दरम्यान, आवश्यक पोषण, प्रथिने, लसूण आणि आले यांचा अभाव नेहमीच रुग्णांना जाणवत होता आणि नगरसेवकांनी आहारात मांसाहाराचा समावेश करावा अशा अनेक मागण्या केल्या होत्या.
यासंदर्भातील प्रस्ताव सीपीडी विभागाकडे पाठवण्यात आला होता. याचा खर्च जवळपास दहा कोटींवर जात होता. तसेच, वाढत्या महागाईनुसार या दरात बदल करून रकमेचा अंदाजित खर्च पाठवण्यात आला आहे. सीपीडीकडे हा प्रस्ताव गेल्यावर याबाबत कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच यात मांसाहाराचा देखील समावेश करण्याबाबत झालेल्या बैठकीत मांसाहार सुरू करण्यास सहमती दर्शविण्यात आली.
मात्र, यापूर्वी कंत्राट असलेल्या इस्कॉनकडून मांसाहारास विरोध करण्यात आला आहे. यापूर्वी मांसाहाराचा आहारात समावेश नसताना आता मांसाहाराचा समावेश का करण्यात आला आहे अशी विचारणा त्यांच्याकडून झाली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सर्व प्रक्रिया ही सीपीडीकडून सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच, 15 -20 दिवसात टेंडर निघणार आहे. चिकन, मासे आणि अंड्याचा समावेश असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
केंद्रीय क्षयरोग विभागाचे पौष्टिक मार्गदर्शक तत्त्व लक्षात घेऊन, आम्ही रूग्ण बरे होण्यासाठी आहारात मांसाहारी अन्न समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आहारात मांसाहाराचा समावेश असावा अशी मागणी अनेक वेळा आमच्या रुग्णांनीही केली होती. शेवटी आम्ही ते सुरू करण्याचा निर्णय घेतला,” असे शिवडी टीबी रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मांसाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहारात चार चपात्या, भात, डाळ, उसळ (सर्व रुग्णांसाठी आठवड्यातून दोनदा) ६० ग्रॅम चिकन असलेली चिकन करी यांचा समावेश असेल. शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहार पनीर/सोया चंक्ससह देण्यात येणार आहे.
टीबीच्या उपचाराचे बहुतेक रुग्ण दीर्घकाळ रुग्णालयात असतात आणि अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांनीही भेट ही दिलेली नसते. उपचारांच्या दुष्परिणामांमुळे एखाद्याला भूक लागत नाही. परंतु, रुग्णांनी मांसाहाराची मागणी केली आणि शेवटी ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.