@maharashtracity

धुळे: धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा ते ज्योती सिनेमा कोपर्‍यापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कॉंक्रीट रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

“तब्बल २० लक्ष रुपये किमतीचा हा सिमेट कॉंक्रीट रस्ता ठेकेदाराने जगातले सर्व रेकॉर्ड तोडून ८ दिवसात तयार करून विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केला,” अशी उपरोधीत टिका शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी केली.

शिवसेना पदाधिकार्‍यांसह थेट ज्योती सिनेमा समोरील रस्त्यावरच पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधण्यात आला. मनोज मोरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेजवळ एकाच रस्त्याचे दोन टेंडर काढून भ्रष्टाचार केला गेला. त्याचा भंडाफोड आम्ही केला. त्यानंतरही मनपा सत्ताधारी भाजपकडून भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे. शहरातील मनपाच्या मालकीच्या रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असतांना त्या ठिकाणी रस्ते करायचे नाहीत व सिंचन विभागाची मालकी असलेल्या पाटावर गरज नसतांना रस्ता टाकण्यात आला.

मोरे म्हणाले, खरे तर कामाचा कार्यादेश दि १०/०२/२०२० रोजी देण्यात आला. या रस्त्याचे अजूनही ४० टक्के काम अपूर्ण आहे. तरी देखील सदर रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून दि.१८/२/२०२० रोजी रनिंग बिल या हेड खाली जवळपास संपूर्ण बिल देण्यात आले.

“बिल देण्याची एवढी घाई काय ? यातले गौडबंगाल काय? धुळे मनपाकडे शेकडो ठेकेदारांचे १० ते २० वर्षापूर्वीचे बिले पेंडिंग असतांना भूषण चौधरी या ठेकेदाराचेच बिल अडव्हांस मध्ये निघतात. कारण हा ठेकेदार सत्ताधारी प्रशासनाचा मोहरा असून यात सत्ताधारी व प्रशासनाची बेकायदेशीर भागीदारी असण्याची दाट शक्यता आहे,” असा आरोप मोरे यांनी केला.

हे सर्व लांडगे मिळून मनपाचे लचके तोडून भविष्यात मनपा डबघाईस नेण्याचे काम करत आहेत. भूषण चौधरी सारखे अजून ३-४ ठेकेदार हेच मनपाच्या ८० टक्के कामांचे कॉंट्रक्ट घेतात. निकृष्ट दर्जाचे कामे करून सर्व टोळी मिळून भ्रष्टाचार करत आहेत. हे करतांना या लोकांना भीती वाटत नाही. कारण या टोळीचा प्रमुख आधार स्तंभ असलेला तथाकथित ‘भैया’ हे सर्व बेकायदेशीर घोटाळे सेटिंग करण्यात तरबेज आहे, असाही दावा मनोज मोरे यांनी केला.

फक्त ८ दिवसात कॉंक्रीट रस्ता तयार करणारी जगातील पहिली महापालिका असून याबद्दल धुळे मनपाचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करुन यांचा सत्कार झाला पाहिजे. तसेच ना. नितीन गडकरी यांनी भाजपची सत्ता असलेल्या धुळे मनपाने विकसित केलेल्या ८ दिवसात कॉंक्रीटरोड तयार करण्याच्या या तंत्रज्ञानाची माहिती घेवून राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी धुळे मनपा कडून मार्गदर्शन घ्यावे, असा टोला मनोज मोरे यांनी लगावला.

अशा प्रकारची बेकायदेशीर कामे करणार्‍या या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून यावर मनपाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. तसेच या ठेकेदाराच्या नावावर जे काही कामे चालू आहेत त्या सर्व कामांना स्थगिती देवून विशेष चौकशी झाली पाहिजे. ओव्हर सियर ते आयुक्त या भ्रष्टाचारी साखळीला निलंबित करून या सर्वांवर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. रस्ते कामातील भ्रष्टाचाराची नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून धुळे मनपाचे विशेष लेखा परीक्षण करण्याची मागणी शिवसेनच्या वतीने पुराव्यासह करणार असल्याचेही मनोज मोरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनावणे, महानगर प्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र पाटील, डॉ सुशील महाजन, गुलाब माळी, संदीप सुर्यवंशी, संदीप चव्हाण, जवाहर पाटील, पंकज भारस्कर, रामदास कानकाटे, ललित माळी, सचिन बडगुजर, भटू गवळी, बाळू आगलावे, पुरुषोत्तम जाधव, अरुण लष्कर, मच्छिंद्र निकम, विकास शिंगाडे, योगेश मराठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here