Twitter @maharashtracity

मुंबई: पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर हृदयाच्या तक्रारी करण्यात येत. आता हृदयाच्या तक्रारी करण्याचे वय तिशी – चाळीशीपर्यंत आले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे आपल्या हृदयाची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देताना दिसून येत आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून मागविलेल्या माहितीच्या अधिकारात मुंबई शहरात रोज २५ ते २६ मृत्यू हे हृदयविकाराने होत आहेत. यातही चाळीशीतील मुंबईकरांचा समावेश अधिक असल्याचे सांगण्यात आले.

यावर बोलताना हृदयविकार तज्ज्ञ डॉ. हेमंत खेमानी यांनी सांगितले की, हृदय विकाराने मृत्यू झालेली माहिती माहिती अधिकारातून मुंबई महानगरपालिकेकडून मागविण्यात आली. यात २५ ते २६ मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे नमूद आहे. गंभीर बाब म्हणजे यात चाळिशीतील नागरिकांचा समावेश वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. 

आकस्मित हृदयरोग किंवा अरुंद रक्तवाहिन्यांमुळे होणारे हृदयविकार हे भारतातील हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. धूम्रपान व मद्यपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, वाल्व मध्ये कॅल्शियम साठा या घटकांमुळे सायलेंट हार्ट अटॅकच्या घटना वाढत असल्याचे सांगण्यात आले. हार्ट अटॅक येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्लेक म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये साचलेला घाणेरडा पदार्थ असतो ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा देखील समावेश आहे. ते तुमच्या कोरोनरी धमन्यांमध्ये जमा होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि ऑक्सिजन असलेले रक्त हृदयाच्या स्नायू पर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते. ज्यांना धूम्रपानाचे व्यसन आहे, तसेच ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ज्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, डायबेटीस किंवा हाय कोलेस्टेरॉल आहे, त्यांना सायलेंट हार्ट अटॅक ही समस्या असू शकते.

काळजी घ्या

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी शरीराची नियमित वैद्यकीय तपासणी, सकस आहार व  नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अवलंबली पाहिजे, सकस आहाराकडे लक्ष द्यावा. ऑफिसमध्ये वर्क लोड वाढल्यामुळे मध्यमवयीन नागरिक ब्लड प्रेशर व मधुमेह सारख्या आजारांना बळी पडत आहेत, यातूनच  हृदयविकार वाढत आहेत. या स्पर्धात्मक युगात नोकरी अथवा व्यवसाय जाण्याची भीती, अपुरी झोप, अवेळी  खानपान, शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष व मानसिक ताणतणाव हि आजची जीवनशैली बनली आहे. यामुळे चाळीशीत आलेल्या नागरिकांनी आपल्या सवयी बदलून हृदयाची काळजी घेणे महत्वाचे आहे, असे डॉ. हेमंत खेमानी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here