@maharashtracity
मुंबई: नागपूर येथील उद्योजक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) च्या विदर्भ (Vidarbha) शाखेचे अध्यक्ष गोपाळ वासनिक यांची डिक्कीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून, तर गेली चार वर्षे मुंबई (Mumbai) शाखेचे अध्यक्ष म्हणून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे उद्योजक अरुण धनेश्वर यांची डिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाली आहे.
अहमदाबाद (Ahmedabad) येथे नुकत्याच पार पडलेल्या डिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष रविकुमार नर्रा यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला आणि डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
धनेश्वर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या डिक्कीच्या मुंबई अध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईतून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात करणारे श्री शिंदे गेली काही वर्षे डिक्की चळवळीशी संलग्न आहेत. या काळात अनेक तरुण दलित उद्योजकांना सभासद म्हणून डिक्कीशी जोडण्यात आणि डिक्कीच्या व्हेंडर डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅम अंतर्गत तरुण उद्योजकांच्या क्षमतावाढीच्या प्रयत्यांना त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
अहमदाबाद येथील बैठकीत महाराष्ट्रातील अनेक नव्या नियुक्त्याही घोषित करण्यात आल्या. त्यात गेली काही वर्षे डिक्कीच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष असलेले संतोष कांबळे यांची पश्चिम भारत समन्वयक म्हणून, नागपूरचे (Nagpur) विजय सोमकुंवर यांची विदर्भ शाखेचे अध्यक्ष म्हणून, तर पुणे (Pune) येथील मुकुंद कमलाकर यांची महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याच सोबत पुणे येथील अनिल ओव्हाळे व मुंबईचे सुगत वाघमारे यांची डिक्कीच्या महाराष्ट्र शाखेच्या उपाध्यक्ष पदी तर, राजू साळवे यांची पुणे शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.