संतप्त वसई – सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

Twitter: @maharashtracity 

मुंबई: एका मिनिटात गणपती स्पेशल रेल्वे गाड्याचे आरक्षण फुल्लचा मुद्दा पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेने गणपती स्पेशल आरक्षणासाठी आवाहन केल्यावर १९ मे रोजी अवघ्या काही मिनिटात आरक्षण फुल्ल झाल्याचे दाखविण्यात आले. यावर कोकण प्रवासी संघटनांना संशय येत असून ज्यांचे गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांचे आरक्षण झाले आहे, अशांचे पत्ते, मोबाईल नंबर मिळावेत, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मुंबई विभागाने केली आहे.

वसई – सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई विभागाने कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल रेल्वेच्या आरक्षण झालेल्यांची नाव आणि पत्ता मिळण्याबाबत माहिती, माहिती अधिकाराखाली कोकण रेल्वे कार्पोरेशन आयुक्तांना विचारली आहे. कोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठी ४ महिने आधी होणारे रेल्वे बुकींग हे सुरुवातीच्या एक ते तीन मिनिटात रिग्रेट कसे काय होते? रेल्वेचे अधिकारी व बुकींग करणारे दलाल हे साटेलोट करुन यात काळाबाजार तर नाही ना करत? अशी कोकणातील गणेशभक्तांना शंका येऊ लागली आहे. यात कोकण रेल्वे व भारतीय रेल्वे प्रशासन यांना खरोखर पारदर्शकता वाटत असेल तर त्यांनी आम्हाला १४ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर पर्यंतचे बुकींग करणारे कोण आहेत, त्यांची नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्यांसह माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. ही माहिती लेखी स्वरुपात मिळावी, अशी मागणी केली असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

आरक्षण फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेलाच साधारण ३ ते ५ मिनिटे लागतात. असे असताना जर एक ते दोन मिनिटात आरक्षण रिग्रेट दाखवत असेल तर पाणी कुठे तरी मुरत आहे. त्यामुळेच संघटनेकडून माहिती अधिकाराखाली आरक्षण झालेल्यांची माहिती मागविली आहे. कोकणवासियांसाठी संघटनांनी विविध गाड्यांच्या मागण्या कराव्यात आणि त्याची पुर्तता झाल्यावर दलालांनी त्या फुल्ल करुन गरजू प्रवाशाला गाडी बाहेर ठेवावे. असाच याचा अर्थ झाला. त्यामुळे प्रवाशांवर अन्याय होऊ देणार नाही.”

– यशवंत जडयार, सेक्रेटरी, वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here