By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (Mhada) २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प शनिवारी प्राधिकरणास सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०,१८६ कोटी ७३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित ६,९३३ कोटी ८२ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट, तर २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात १,१३६ कोटी ४७ लाख रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात (Budget of Mhada) प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२,७२४ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५,८०० कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २,१५२ सदनिकांची उभारणी (Housing stock) करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३,६६४ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २,२८५ कोटी रुपयांची तरतूद केली असून ॲण्टॉप हिल, वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २४ कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ३० कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपये, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील योजनेसाठी २१३ कोटी २३ लाख रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १८ कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

गोरेगांव-सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब साठी ५९ कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी १० कोटी रुपये, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोंकण मंडळाअंतर्गत ५,६१४ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये, बाळकूम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये, माजिवाडे, ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये, मीरा रोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पुणे मंडळाअंतर्गत ८६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४० कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नागपूर मंडळाअंतर्गत १,४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजी नगर मंडळाअंतर्गत १,४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२ कोटी ०८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here