२१ गावातील रहिवाशांचा रायगड ते मुंबई लॉंग मार्चचा इशारा

By Milind Mane

Twitter: @manemilind70

मुंबई: महाराष्ट्राच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड येतील रायगड किल्याच्या पायऱ्या आणि संरक्षक भिंतीचे दुरुस्तीचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट असल्याने आतापर्यंत चार पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच शासन निधीचा अपव्यय होत असून या बांधकामास जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल आणि किल्ले रायगड ते महाड असा लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष व रायगड किल्ला परिसर एकवीस गाव पंचक्रोशी विकास प्राधिकरण संघर्ष समितीचे सेक्रेटरी सुभाष मोरे यांनी शासनाला दिला आहे.

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडची डागडुजी करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रायगड प्राधिकरणामार्फत यापूर्वीच (रायगड किल्ला विशेष स्थापत्य पथक) स्थापन करण्यात आले. यामार्फत मागील चार वर्षात किल्ल्यावरील पायऱ्या व संरक्षण भिंतीची कामे करण्यात येत आहे. 

रायगड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या रकमेची तरतुदीची करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी केली होती. तसेच २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा पायाभरणी समारंभ पार पडला, त्यावेळी देशभरातील ऐतिहासिक गड किल्ल्याच्या संवर्धन व जतनासाठी रोल मॉडेल म्हणून रायगड किल्ल्याचा विकास करण्याचा केंद्र शासनाचा मनोदय पंतप्रधानांनी व्यक्त केला होता.

त्यानुसार रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने दिनांक २२ ऑगस्ट २०१६ रोजी 606 कोटी 9 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने दिनांक १५ मार्च २०१७ रोजी आणि नंतर मंत्रिमंडळाने रायगड किल्ला जतन व संवर्धन व पर्यटन विकास आराखड्याला मान्यता मिळाली.

रायगड जिल्हा नियोजन समितीने दिनांक १० नोव्हेंबर २०१७ रोजी किल्ल्यावरील 1856 कोटी 36 लाख रुपये रकमेच्या चार कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यामध्ये (१) नाणे दरवाजा ते मशीद मोचा पर्यंतच्या पदपथाचे मजबुतीकरण, पायऱ्या संरक्षक कठडे,  रेलिंग, पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी कामांसाठी 593.22 लक्ष रुपये

(२) चित्त दरवाजा ते महादरवाजा पदपथापैकी महादरवाजा 0 ते 300 मीटर पर्यंतच्या पायऱ्या, संरक्षक कठडे, रेलिंग, पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी बनविणे यासाठी रुपये 383.84 लक्ष

(३) चित्त दरवाजा ते महादरवाजा पद पथापैकी महादरवाजा 300 ते 1300 मीटर पर्यंतच्या पायऱ्या, संरक्षक कठडे, रेलिंग, पाणी वाहून नेण्याची गटारे इत्यादी बनविणे यासाठी रुपये 364.06 लक्ष.

(४)  चित्त दरवाजा ते महादरवाजा पद पथापैकी महादरवाजा १३०० ते १८५० मीटर पर्यंतच्या पायऱ्या, संरक्षक कठडे, पाणी वाहून नेण्याची गटारे बनविणे यासाठी रुपये 515.24 लक्ष

रायगड जिल्हा नियोजन समितीने दिनांक १० नोव्हेंबर २०१७ रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर 2018 मध्ये या कामांना सुरुवात करण्यात आली. मात्र, या कामाला २०१९ मध्ये प्रत्यक्ष मूर्त रूप आले. ही कामे करणारे ठेकेदार हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत. रायगड किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण तीन हजार मिलिमीटर पेक्षा जास्त असल्याने या कामांचा या ठेकेदारांना कोणताही पुर्व अनुभव नाही. या पायऱ्यांच्या कामासाठी वापरण्यात येणारा दगड विशिष्ट प्रकारचा असणे गरजेचे असताना व तो बसविताना पृष्ठभाग हा सपाट असणे गरजेचे असताना त्याची कोणतीही पडताळणी रायगड प्राधिकरणाने न केल्याने एजन्सी धारकांनी आपल्या मनमानी पद्धतीने स्थानिक उत्खनन केलेला दगड वापरून प्रशासनाची दिशाभूल केली आहे.

रायगड प्राधिकरणामार्फत किल्ले रायगड पायऱ्यांची कामे करताना त्यामध्ये सिमेंट ऐवजी चुना, गुळ, बेलफळ यांचे एकत्रित मिश्रण करून ते विशिष्ट प्रकारच्या घाण्यामध्ये भिजत घालून आठ ते दहा दिवसानंतर त्याचा वापर करून मगच ते पायऱ्यांच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र, त्याची कोणतीही पडताळणी न करता वापर केल्याने गडावरील पायऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून ती दोन वर्षातच कोसळून पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत.

रायगड किल्ल्यावरील पायऱ्यांच्या कामांबरोबरच संरक्षक भिंतीची कामे करताना किल्ल्यावरील जुनी वृक्षतोड करून संरक्षण भिंतीची कामे करण्याचे काम एजन्सी धारकांनी केल्याने डोंगर उतारावरील माती नष्ट झाली आहे. संरक्षक भिंतीची कामे देखील निकृष्ट दर्जाची झाल्याने व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या गटारीदेखील तकलादू स्वरूपात केल्याने गडावरून येणारे पावसाचे पाणी गटारामध्ये न जाता ते पायऱ्यांवरून वाहून जाऊन थेट संरक्षक भिंतीवर येत असल्याने संरक्षक भिंतीच वाहून गेल्या आहेत.

रायगड किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता यापूर्वी पुरातत्त्व विभागाने केलेली पायऱ्यांची कामे व रायगड प्राधिकरणामार्फत चालू असलेली पायऱ्यांची कामे यात मोठी तफावत आहे. पुरातत्त्व विभागाची कामे रायगडवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यातदेखील तग धरून आहेत. मात्र प्राधिकरणाने केलेली कामे दोन वर्षातच पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अनुभवी नसलेल्या एजन्सी प्रमाणे रायगड प्राधिकरणाच्या कार्यालयामधील रायगड किल्ल्याच्या कामासंदर्भात देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेले शाखा अभियंता आणि उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना देखील अनुभव नसल्याने शासनाच्या करोडो रुपयांचे वाटोळे करण्याचे काम रायगड प्राधिकरण करत आहे. शासनाचे लाखो रुपये ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे बुडाले आहेत व त्यांनी केवळ ठेकेदारांचे भले केले आहे,  त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याची मागणी 21 गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रायगड प्राधिकरणामार्फत रायगड किल्ल्यावर चालू असलेल्या सर्वच कामांची शासनाने दक्षता व गुण नियंत्रण पथकामार्फत तसेच वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषी शाखा अभियंतासहित रायगड प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी 21 गाव विकास प्राधिकरण संघर्ष समितीचे सचिव सुभाष मोरे यांनी शासनाकडे केली आहे. 

या 21 गावातील नागरिक लवकरच याबाबत उपोषणाचा निर्णय घेणार असून उपोषणाद्वारे शासनाला जाग न आल्यास रायगड किल्ला ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढून रस्त्यामधील मुख्य गावात व चौका चौकात रायगड प्राधिकरणाने केलेल्या भ्रष्टाचारासंबंधात जनतेमध्ये जनजागृती करणार असल्याचे सुभाष मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here