@maharashtracity

मुंबई: गोवंडी येथील पालिकेच्या ज्या उद्यानाला वादग्रस्त टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट घालण्यात आला आहे, ते उद्यान अद्यापही तयार करण्यात आलेले नाही. या उद्यानाची एक वीटसुद्धा रचलेली नाही. उद्यानाची जागा उजाड पडली आहे. या जागेवर पावसाचे पाणी साचले असून या जागेचा वापर टॅक्सी पार्क करण्यासाठी करण्यात येत असल्याची धक्कादायक व गंभीर बाब चव्हाट्यावर आली आहे.

त्यामुळे हा एकूणच प्रकार जरी गंभीर असला तरी उद्यानाचा जन्मच झालेला नसताना त्याच्या नामकरणाचा गाजावाजा सुरू आहे.

गोवंडी विभागात समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, महापालिकेच्या उद्यानाला ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची मागणी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत जानेवारी २०२१ रोजी केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने, सकारात्मक अभिप्राय देत त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र १५ जुलै रोजी पार पडलेल्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून मोठा गदारोळ झाला होता.

भाजप नगरसेवकांनी प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती तर शिवसेनेने प्रस्ताव अपूर्ण असल्याचे कारण देत तो परत प्रशासनाकडे पाठवला.

त्यामुळे भाजप व शिवसेना यांच्यात या उद्यानाच्या नामकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपने या प्रकरणावरून शिवसेनेला डिवचल्याने महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) या आक्रमक झाल्या. त्यांनी टिपू सुलतान याचे नाव गोवंडी येथील एका रस्त्याला २०१३ मध्ये देण्याबाबत सादर प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक अमित साटम यांनीच अनुबोधन दिल्याचे प्रकरण उघडकीस आणून भाजपचे दात घशात घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावर भाजपचे तत्कालीन नगरसेवक व आताचे आमदार अमित साटम यांनी, तीव्र आक्षेप घेऊन महापौरांनी खोटी माहिती दिल्याचे सांगत याप्रकरणी सत्य माहिती सादर न केल्यास अब्रुनुकसानीचा दावा (Defamation case) दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) याचे नाव देण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आता भाजपचे प्रवक्ते व स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट (BJP Spokesperson Bhalchandra Shirsat) यांनी, शनिवारी सदर वादग्रस्त उद्यानाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली असता त्या जागेवर उद्यान काय, उद्यानाची एक वीटसुद्धा रचण्यात आलेली नसल्याची गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here