@maharashtracity

४० लाखांचे भाडे थकीत

धुळे: येथील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलासह (Sports Complex) गरुड मैदानावरील व्यापारी संकुलातील तब्बल २२३ गाळेधारकांना जिल्हा क्रीडाधिकार्‍यांनी अंतिम नोटीस बजावली आहे.

सुमारे ४० लाखांचे भाडे थकविणार्‍या गाळेधारकांना हि नोटीस बजावून १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत भाडेपट्टा करारनामा न केल्यास संकुल समितीमार्फत गाळे जप्तीच्या कारवाईचा इशारा जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी दिला आहे.

येथील जिल्हा क्रीडा संकुल व गरुड मैदानातील व्यापारी संकुले जिल्हा क्रीडाधिकार्‍यांच्या अखत्यारीत येतात. या दोन्ही संकुलांतील गाळे करारनाम्याने भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलात एकूण १९० गाळे आहेत. त्यापैकी पाच गाळे गेल्या २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. या गाळेधारकांकडे अनामत रकमेसह मासिक भाडेही थकीत असल्याने जप्तीची कारवाई झाली.

ज्या गाळेधारकांनी २००६ पासून गाळे घेतले परंतु अद्याप क्रीडा संकुल समितीचा करारनामा केलेला नाही, केवळ गाळ्याची अनामत रक्कम भरली आहे व गाळा ताब्यात घेऊन वापर करत आहेत, अशा गाळेधारकांकडे जिल्हा क्रीडाधिकार्‍यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

तथापि, जिल्हाधिकार्‍यांनीच तसे आदेश दिले असून, त्यानुसार कार्यवाही सुरू झाली.
शिवाय, शहरातील गरुड मैदानावरील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा करारनामा३३ वर्षांचा आहे. या संकुलातील तब्बल १३३ गाळेधारकांनी अद्याप भाडेपट्टा करारनामा केलेला नाही. शिवाय यातील काही गाळेधारक नियमित भाडेही भरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व गाळेधारकांनाही नोटीस बजावून १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ही अंतिम नोटीस असून, यानंतर थेट संकुल समितीमार्फत जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांना स्वतः जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते नोटीस देण्यात आली. कार्यालयातील लिपिक योगेश देवरे, योगेश पाटील, ज्ञानेश्‍वर जाधव, राहुल पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here