लेप्टो आजाराला कारणीभूत उपद्रवी दीड लाख उंदीर,घुशींचा खात्मा
पालिका कीटकनाशक विभागाची मूषकविरोधी मोहीम
मूषकसंहारक पथकाची सहा महिन्यात कारवाई
@maharashtracity
मुंबई: मुंबईत विशेषतः झोपडपट्टी परिसरात नागरिकांना उंदीर व घुशी यांचा उपद्रव मोठया प्रमाणात जाणवतो. विशेषतः पावसाळ्यात प्राणी, उंदीर यांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्याने नागरिकांना पायाच्या जखमेच्या माध्यमातून लेप्टोसारखा (leptospirosis) जीवघेणा आजार बळावतो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) कीटकनाशक विभागामार्फत जानेवारी महिन्यापासूनच मूषक संहार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात या पथकाने तब्बल दीड लाख उपद्रवी उंदीर, घुशी यांचा खात्मा करून त्यांना यमसदनी पाठवले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पालिकेच्या किटक नाशक विभागाने विशेष मोहीमेतंर्गत जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ५९ हजार ५६४ उंदरांचा खात्मा केला आहे. यासंदर्भातील माहिती, पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
मुंबईकर सध्या कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा मुकाबला करताना बेजार झाले आहेत. मुंबईत मार्च २०२० पासून ते कालपर्यंत कोरोनाबाधित ७ लाख १९ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६ लाख ९२ हजार ७८७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून अद्यापही विविध रुग्णालयात ९ हजार १४८ रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज ५०० पेक्षाही जास्त रुग्ण आढळून येत असून दररोज १५ पेक्षाही जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे.
या कोरोनाचा एकीकडे मुकाबला करण्यात पालिका आरोग्य यंत्रणा २४ तास व्यस्त असतानाच दुसरीकडे स्वाईन फ्ल्यूनेही डोके वर काढले आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आता लेप्टो आजाराला कारणीभूत उपद्रवी उंदीर व घुशी यांचा संहार करण्याची मोहीम पालिका कीटकनाशक विभागाने जानेवारी महिन्यापासून हाती घेतली असून जून अखेरपर्यन्त मूषक संहारक पथकाने तब्बल दीड लाख उंदरांचा खात्मा करून त्यांना यमसदनी पाठविण्याचा मोठा भिमपराक्रम केला आहे. त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
साचलेल्या पाण्यात उंदीर, घुस, कुत्री, मांजरी यांचे मलमूत्र मिश्रित झाल्यास व त्या पाण्याशी एखाद्या व्यक्तीच्या जखम झालेल्या पायाचा संपर्क झाल्यास लेप्टो आजाराला निमंत्रण मिळते. या आजाराला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केल्यास हा आजार जास्त बळावतो व त्यात त्या रुग्णांचा बळी जाण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची जी जी ठिकाणे असतात त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाते. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्यापूर्वी व पावळ्यातही उघडीप मिळाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो.