राज्यात २४८ नवीन रुग्णांची नोंद
Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात रविवारी ५६२ एवढी कोरोना रुग्ण नोंद असताना सोमवारी मात्र २४८ एवढे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले. ही नोंद रविवारच्या तुलनेत निम्म्यांवर होती. आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,४५,५९० झाली आहे. तर सोमवारी २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९३,६१३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के एवढे आहे. तर राज्यात सोमवारी एक करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,४६,४३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४५,५९० (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ३५३२ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यात सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत.
यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत विमानतळांवर एकूण १६,७९,२५३ आलेले प्रवासी आले. यातील आर टी पी सी आर केलेले प्रवासी ३७,४१८ असून आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी ५२ जणांचे नमुने पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबईत दिवसभरात ७५ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ११,५६,६०६ एवढे बाधित असल्याचे सांगण्यात आले. तर आज शून्य मृत्यूची नोंद असून आतापर्यंत १९,७४७ मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.