Twitter :@maharashtracity

मुंबई: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २५ मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. त्याआधी २० ते २४ मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. 

मुंबईसह पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह यंदा औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेशही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. प्रवेशाचे रितसर वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे.  

दरम्यान, नोंदणी तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव तारीख २० ते २४ मे दरम्यान होणार आहे. तर प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग १ भरणे २५ मेपासून पुढे एसएससी बोर्डाच्या निकालापर्यंत राहिल. तर अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे, २५ मे पासून पुढे एसएससी निकालानंतर दोन दिवसापर्यंत राहणार आहे. कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी २० मेपासून दहावी निकालापर्यंत असे राहिल. तर कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे (अर्ज भाग २) एसएससी निकालानंतर पाच दिवस पर्यंत होईल. कोटातंर्गत प्रवेश एसएससी निकालानंतर पाच दिवस त्यासोबत नियमित प्रवेश फेरी १ एसएससी निकालानंतर १० ते १५ दिवस राहणार आहे. नियमित प्रवेश फेरी दुसरी ७ ते ९ दिवस राहणार आहे. नियमित प्रवेश तिसरी फेरी  ७ ते ९ दिवस अशी राहिल. तर विशेष पहिल्या फेरी ७ ते ८ दिवस व विशेष फेरी २ (एटीकेटीसह)एक आठवडाभर राहणार आहे. दैनंदिन प्रवेश फेरी आवश्यकता भासल्यास सुरु ठेवण्यात येईल.

विशेष फेरी १ नंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार :

ऑगस्टअखेरपर्यंत अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच यंदा विशेष फेरी १ नंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना प्राचार्यांना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मागासवर्गीय, विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ठेवण्यास सुचित करण्यात आली आहेत. संबंधित महसूल यंत्रणांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पुरविण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाईन प्रवेशाची पूर्वतयारी सुरू करावी आणि विद्यार्थी, पालक यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग घ्यावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here