माहिती अधिकारातून माहिती उघड

Twitter: @maharashtracity

मुंबई: गेल्या पाच वर्षात १०१० जणांना सदोष रक्त पुरवठ्यामुळे एचआयव्ही बाधा झाली असल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती उघड केली असून २०१७ ते २०२२ या पाच वर्षात महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही दुषित रक्त पुरवठ्यामुळे एचआयव्ही बाधा झाली असल्याची माहिती देण्यात आली. 

दरम्यान, दुषित रक्त पुरवठा झाल्याने एचआयव्ही बाधा झाल्याचा समज पूर्णपणे चुकीचा असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर शरीरात अशुद्ध रक्त चढवल्याने एचआयव्ही-एड्सची लागण झाल्याची चुकीची माहिती ’अँटी रेट्रो व्हायरल थेरपी‘ (एआरटी) केंद्रांना देत अनेक रुग्ण पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ ते २०२२ या पाच वर्षात ७६७० जणांना दुषित रक्तामुळे एचआयव्ही बाधा झाली. राज्यात ही आकडेवारी १०१० एवढी आहे. तर उत्तरप्रदेश राज्यात दुषित रक्तामुळे १४९४ जणांना एड्सची बाधा झाली होती. दिल्ली ४८४ आणि गुजरातमध्ये १९९ जणांना एड्सची लागण झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. 

अशुद्ध रक्त पुरवठ्यामुळे एचआयव्हीची लागण झालेल्यांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील आकडेवारी नुसार २०१७ या वर्षी दुषित रक्ताने सर्वाधिक म्हणजे १९० जणांना एचआयव्ही बाधा झाली असून सर्वाधिक कमी म्हणजे ९१ जणांना २०२० या वर्षात एचआयव्ही बाधा झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील आकडेवारी

२०२२ जुलैपर्यंत २७२, सन २०२१ मध्ये ११८, सन २०२० मध्ये ९१, सन २०१९ मध्ये १८५, सन २०१८ मध्ये १५४ तर सन २०१७ मध्ये १९० रुग्णांना एच आय व्ही बाधा झाली.

अत्याधुनिक नॅट टेस्ट पर्याय 

रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर एचआयव्ही तपासणीसाठी एलायझा टेस्ट केली जाते. मात्र ही टेस्ट १०० टक्के खात्रीलायक नसून जुनी पद्धत असल्याचे सांगण्यात येते. अशावेळी अत्याधुनिक नॅट (न्यूक्लिअर ऍसिड टेस्ट) करणे आवश्यक असून नॅटची टेस्ट खर्चिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. यात एक युनिट रक्त तपासायचे असेल तर त्यासाठी १००० ते १२०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मुंबईत काही खासगी रक्तपेढ्यांकडे ही टेस्ट उपलब्ध आहे. राज्यभरातील सरकारी इस्पितळांमध्ये जर नॅटची यंत्रणा बसवायचे म्हटले तर त्यासाठी काही हजार कोटींपेक्षा अधिकचा खर्च येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here