विशेष ग्रामसभादेखील रद्द होणार?

By मिलिंद माने

Twitter: @milidmane70

मुंबई: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या आचारसंहितेमुळे येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसेवकांच्या हातूनच झेंडावंदन होणार आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी होणाऱ्या विशेष ग्रामसभादेखील आचारसंहितेच्या कारणामुळे रद्दबातल ठरणार आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या व नगरपरिषदा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येदेखील सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याशिवाय जिल्हा परिषदमधील मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यांमधील मुख्यालयांमध्ये गटविकास अधिकारी व नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी यांच्यावतीने झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर ठाणे व पालघर जिल्ह्यात ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, मीरा – भाईंदर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका यांच्यासहित कुळगाव- बदलापूर नगरपालिका, शहापूर नगर पंचायत, मुरबाड नगर पंचायत व ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर व उल्हासनगर पंचायत समिती या ठिकाणीदेखील मुख्याधिकारी अथवा गट विकास अधिकारी यांच्यामार्फत झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई- विरार महानगरपालिका व पालघर जिल्हा परिषद, तसेच पालघर पंचायत समिती, तलासरी पंचायत समिती, वसई पंचायत समिती, डहाणू पंचायत समिती, वाडा पंचायत समिती, विक्रमगड पंचायत समिती, मोखाडा पंचायत समिती त्याचबरोबर डहाणू, तलासरी, वाडा, जव्हार व पालघर या नगरपंचायतींमध्ये देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे.

कोकणातील शिक्षक मतदार संघाच्या आचारसंहितेमुळे नुकत्याच डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच जिल्ह्यातील 40 तालुक्यातील 1073 नव्याने जनतेतून निवडून आलेले सरपंचदेखील या झेंडावंदनाच्या कार्यक्रमापासून वंचित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने जनतेमधून निवडून आलेल्या सरपंचपदांची आकडेवारी देवगड तालुक्यातील 38, दोडामार्ग तालुक्यातील 28, कणकवली तालुक्यातील 58, कुडाळ तालुक्यातील 54, मालवण तालुक्यातील 55, सावंतवाडी तालुक्यातील 52, वैभववाडी तालुक्यातील 17 व वेंगुर्ला तालुक्यातील 23 असे 325 नव्याने सरपंच जनतेमधून निवडून आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील 32, दापोली तालुक्यातील 30, गुहागर तालुक्यातील 21, लांजा तालुक्यातील 19, मंडणगड तालुक्यातील 14, रत्नागिरी तालुक्यातील 29, संगमेश्वर तालुक्यातील 36, खेड तालुक्यातील 10, राजापूर तालुक्यातील 31 असे नऊ तालुक्यातील 403 सरपंच जनतेतून निवडून आले होते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील 6, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील 7, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील 1, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, माणगाव तालुक्यातील १९, मुरुड तालुक्यातील 5, मसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील 5, सुधागड तालुक्यातील 14, श्रीवर्धन तालुक्यातील १३ व महाड तालुक्यातील 73 अशा 15 तालुक्यातील 240 ग्रामपंचायतीचे सरपंच हे जनतेतून निवडून आले होते.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 14, कल्याण तालुक्यातील 9, मुरबाड तालुक्यातील 14 व शहापूर तालुक्यातील 5 अशा चार तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीचे सरपंच हे जनतेतून निवडून आले होते. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील 32, तलासरी तालुक्यातील 1, वसई तालुक्यातील 15 व वाडा तालुक्यातील 15 अशा चार तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे सरपंच हे जनतेतून निवडून आले होते.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत पाच जिल्ह्यातील 40 तालुक्यातील 1073 ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडून आले होते. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर प्रथमता झेंडावंदन आपल्या हस्ते होणार याचा या सरपंचांना आनंद होता. मात्र, कोकणातील शिक्षक मतदार संघातील आचारसंहितेमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here