@maharashtracity

धुळे: एस. टी. महामंडळातील कर्मचार्‍यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचारी संपाचे हत्यार उपसणार असून, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन एस. टी. इंटक वर्कर्स कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी धुळ्यात केले आहे.

धुळे विभागीय एस. टी. वर्कर्स (इंटक) (ST Intuc Union) कॉंग्रेसतर्फे सोमवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एस. टी. कामगारांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी जयप्रकाश छाजेड (Jaiprakash Chhajed) अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष छाजेड म्हणाले की, राज्यात अस्तित्वात असणार्‍या ३२ महामंडळांपैकी ३१ महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा झाली. राज्य सरकारने त्याबाबत समितीही नेमली आहे. मात्र, एस. टी. महामंडळाला वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

एस. टी. महामंडळातील सर्वच कामगारांचे काम जीवघेणे, जोखमीचे आणि कष्टाचे आहे. अशा स्थितीत वर्षानूवर्षे अल्प पगारावर काम करूनही सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) लागू न करणे, हे महापाप करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. त्यामुळे आता संपाचे हत्यार उपसल्याशिवाय पर्याय नाही. धुळे (Dhule), नंदूरबारसह (Nandurbar) राज्यातील एस टी कामगारांनी लवकरच राज्यव्यापी संपासाठी सज्ज राहावे, असे अवाहनही त्यांनी या वेळी केले.

या वेळी माजी आमदार शरद पाटील, जयप्रकाश छाजेड यांच्या हस्ते इंटकचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, माजी डेपो अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.

इंटकचे माजी विभागीय सचिव सी. डी. ठाकरे, माजी विभागीय अध्यक्ष एन.व्ही. रवंदळे, माजी विभागीय उपाध्यक्ष एम.के. भामरे, माजी विभागीय सचिव एस.पी. पाटील, माजी विभागीय उपाध्यक्ष एम.पी.देसले नंदुरबार, माजी विभागीय उपाध्यक्ष बापू कोळी शहादा, माजी विभागीय अध्यक्ष जी.एस. पाटील, माजी विभागीय सचिव इंटक जी.टी.जयस्वाल व डी.टी. नाईक यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

तसेच कोविड योद्धा पुरस्कार धुळे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, वरिष्ठ आगार व्यवस्थापक अनुजा दुसाने, विभागीय वाहतूक अधीक्षक पंकज देवरे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते धुळे, आगार व्यवस्थापक स्वाती पाटील यांना देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here