@maharashtracity

धुळे: कोरोना महामारीने (corona pandemic) नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

साक्री येथील श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै. डॉ. भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालयात शिक्षणशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी विभागातर्फे कोरोना काल, आज आणि उद्याचे आपत्ती व्यवस्थापन याविषयावर राष्ट्रीय वेबिनार झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. मंगला देसले, अध्यक्षा मृणाल देसले, संचालक डॉ.अजिंक्य देसले, श्रुतिका देसले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते झाले.

डॉ. योगेश सूर्यवंशी म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य, जगण्याच्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोठा बदल घडत असल्यामुळे कोरोना सारखी महामारी पसरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे यांनी भूतकाळात उत्पन्न झालेल्या महामारींचे कसे नियोजन केले ते सांगितले. तसेच भविष्यात उद्भवणार्‍या महामारींचे नियोजन कसे केले पाहिजे याची मांडणी केली.

या वेळी विविध नैसर्गिक आपत्तींवर प्रकाश टाकण्यात आला. त्यात किल्लारीचा भूकंप, गुजरातमधील (Gujarat) भूजचा भूकंप, उत्तराखंडमधील (Uttarakhand) ढगफुटी, पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) अतिवृष्टी, आसाममधील महापूर किंवा त्सुनामी लाटा आदींचा समावेश होता.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) कायद्याची माहिती देण्यात आली. या वेळी लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली. वेबिनारचे समन्वयक प्रा. दिनकर पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. डॉ. रितिका दिनकर अहिरराव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here