8 मे जागतिक थॅलेसेमिया दिन विशेष
Twitter: @maharashtracity
मुंबई: थॅलेसेमियाग्रस्त बालक जन्माला येऊ नये म्हणून गरोदर महिलांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून थॅलेसिमियाच्या तपासणी करणे आवश्यक आहे. काही सजग महिला खाजगी रुग्णालयात तपासणी करतात. मात्र पालिका तसेच राज्य सरकारी रुग्णालयात प्रत्येक गर्भवती महिलेची थॅलेसेमियाची तपासणी केली जात नाही. त्यामुळे आता गर्भवती महिलांच्या थॅलेसेमिया तपासणीसाठी राज्य सरकारने पुढकार घेतला असून गर्भावत महिलांची जिल्ह्यातील रुग्णालयात एचपीएलसी तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. यातून तीन महिन्यांच्या आत तपासणी झाल्यास प्रेग्नेंसी टर्मिनेट करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, थॅलेसेमियाग्रस्त पालकांची मुले थॅलसेमियाग्रस्त होऊ शकतात. लग्नापुर्वी याबाबतच्या तपासण्या न झाल्याने अनेकदा पालक दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असल्याचे समजते. त्यामुळे बाळाला थॅलेसेमिया होण्याची शक्यता २५ टक्के होते. त्यामुळे सर्व गरोदर महिलांची तपासणी होण्याची गरज निर्माण झाली. सध्या राज्यात ११००० थॅलेसेमियाचे रुग्ण असून त्यांना कार्ड देण्यात आले आहे. हे कार्ड दाखविल्यास थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्तपेढ्यांनी मोफत रक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
थॅलेसेमियाचे जनजागृती आणि तपासणी व्हावी यासाठी समृद्धी फाउंडेशनने पुढाकार घेतला. त्यांनी अकोल्यासह बुलढाणा, अमरावती, यवतमाळ व वाशिम या पाच जिल्ह्यात हाय परफॉर्मन्स लिक्विड प्रोमॅटाग्राफी (एचपीएलसी) तपासणी करण्यासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितली. त्यानंतर आता आयुक्तांनी देखील या पाच जिल्ह्यात सर्व गरोदर महिलांची एचपीएलसी तपासणी करण्यासाठीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या पाच जिल्ह्यात गर्भवती महिलांच्या एचपीएलसी चाचणीला सुरुवात झाली आहे.
ही बाब लक्षात घेत राज्य सरकारकडून देखील सर्व जिल्ह्यात एचपीएलसी चाचणी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असून अजून याला मान्यता मिळालेली नसली तरी हे काम लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर संस्थेला हे काम देण्यात येईल. मात्र रुग्णांसाठी ही तपासणी मोफत असेल, असे डॉ महेंद्र केंद्रे यांनी सांगितले.
तसेच पहिले बाळ थॅलेसिमियग्रस्त असल्यास दुसऱ्या वेळी गर्भवती महिलेने प्री नेटल टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. बोरीवली येथील महापालिकेचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट असलेल्या सेंटरमध्ये ही तपासणी मोफत होते. मात्र अशा गर्भवती महिलेने ही तपासणी तीन महिन्याच्या आत केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसिमिया आहे की नाही हे पाहिले जाऊ शकते. थॅलेसेमिया आजार असल्यास अशा महिलेची प्रेग्नेंसी टर्मिनेट करता येऊ शकते. वर्षाला दहा ते पंधरा केसेस या ठिकाणी येत असल्याचे डॉ. केंद्रे यांनी सांगितले