५ वर्षात ३,२४,६८६ लोकांना कुत्र्यांचा चावा

५ वर्षात फक्त ८०,५१३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण

दरवर्षी सरासरी फक्त १६,१०२ कुत्र्यांचे निर्बीजीकरण

@maharashtracity

मुंबई: मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे मुंबईकरांचे जगणे मुश्किल झाले आहे. सन २०१८ ते ऑगस्ट २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांपासून तरुण, तरुणी, महिला व वयोवृद्धांपर्यंत अशा तब्बल ३ लाख २४ हजार ६८६ लोकांच्या हात, पाय, कंबर , पोट आदी शरीराच्या विविध भागात चावे घेऊन लचके तोडले आहेत. सरासरी काढल्यास दरवर्षी ६५ हजार लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे निदर्शनास येते.

पालिकेने सन २०१८ ते ऑगस्ट २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत फक्त ८० हजार ५१३ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. त्यामुळे मुंबईकरांची या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमधून सुटका होणार कधी ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मुंबई महापालिका दीड कोटी जनतेला पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी विविध सेवासुविधा यांचा पुरवठा करते. तसेच, भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करते. पालिकेने भटक्या कुत्र्यांचे निबिर्जिकरण करण्यासाठी १२ संस्थांची निवड केली आहे. तर अशासकीय संस्थांना एका कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी ६०० ते ८०० रुपये देण्यात येतात.

दिनांक २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत भटक्या कुत्र्यांचे लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहिम यापुढेही सुरु ठेवण्यात येणार आहे. कुत्रे चावल्याने होणाऱ्या रेबीज रोगापासून नागरिकांना मुक्त करण्याचे लक्ष्य गाठण्याचा मानस देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलिमपाशा पठाण यांनी व्यक्त केला आहे.

तरीही पालिकेला भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यात अपेक्षित यश आलेले नाही. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीतच भटक्या कुत्र्यांनी ५० हजार ६२२ जणांचा चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने २०१४ ला केलेल्या जनगणनेनुसार २ लाख ९६ हजार २२१ एवढी कुत्र्यांची संख्या आहे.

गेल्या पाच वर्षांत कुत्रे चावल्याची संख्या

२०१८ – ८५,४३८
२०१९ – ७४,२७९
२०२० – ५३,०१५
२०२१ – ६१,३३२
जानेवारी ते ऑगस्ट २०२२ पर्यंत -: ५०, ६२२

एकूण ३,२४,६८६ जणांना कुत्र्यांचा चावा

गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आकडेवारी -:

२०१८ – २१,८८६
२०१९ – १८,९१२
२०२० – १४,४०८
२०२१ – १७,५३४

ऑगस्ट २०२२ पर्यंत – ७,७७३
एकूण निर्बीजीकरण – ८०,५१३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here