Twitter: @maharashtracity

मुंबई: क्रिकेट या खेळाची जननी इंग्लंड नसून बेल्जियममधील विणकरांनी सोळाव्या शतकात फ्लांडर्स प्रांतातून तो खेळ इंग्लंडकडे नेला, असा दावा बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकीन्स यांनी येथे केला. गिरकीन्स यांनी सोमवारी (दि. ५) राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

क्रिकेट आज भारताचा जणू राष्ट्रीय खेळ झाला असून काहींच्या मते तर क्रिकेट ‘धर्म’ आहे. बेल्जियममध्ये आज क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळत नसले तरीही तो खेळ मुळात आमचा आहे, असे त्यांनी सांगितले.  

मुंबई आणि बेल्जियममधील अँटवर्प दोन्ही हिऱ्यांच्या व्यापाराची शहरे आहेत आणि दोन्ही ठिकाणी व्यापारी बंदरे आहेत.  बेल्जियममध्ये फ्लेमिश प्रांत, ब्रसेल्स व वलून हे तीन स्वायत्त प्रांत असून तेथे सशक्त प्रादेशिक सरकारे आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतातील दूतावासात या तिन्ही प्रांतांचे व्यापार प्रतिनिधी बसतात व आपल्या राज्यात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले. 

भारतातील लोकांना बेल्जियमची माहिती व्हावी व बेल्जियमच्या लोकांना भारताबद्दल माहिती व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच बेल्जीयमकडे युरोपीय संघाचे अध्यक्षपद येत असून आपण भारताशी मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिकू चित्रपटाचे बरेचशे चित्रीकरण बेल्जियममध्ये झाले असल्याचे सांगून आपण भारतीय चित्रपट उद्योगाला देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर चालना देणार असल्याचे गिरकीन्स यांनी सांगितले.  

बेल्जियमच्या गेंट, लूवन व ब्रसेल्स मुक्त विद्यापीठांचे भारतातील काही विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करार झाले असल्याबद्दल आनंद व्यक्त करून बेल्जियमने महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत देखील सहकार्य प्रस्थापित करावे असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले. बेल्जियमच्या १६० कंपन्या भारतात काम करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून उभय देशांमधील व्यापार १५.१ बिलियन युरो वरून वाढून मोठ्या प्रमाणात तो वाढू शकतो असे राज्यपालांनी सांगितले. पहिल्या महायुद्धात फ्लॅण्डर्स येथे  वीर मरण प्राप्त झालेल्या ९००० शहिद जवानांचे वायप्रेस येथे स्मारक बनविल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here