जुन्या इमारतीवरच काम करून पैशाची उधळपट्टी – ग्रामस्थांचा आरोप

@maharashtracity

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्मशाळेचे काम रायगड प्राधिकरणच्या माध्यामतून केले जात आहे. जुन्या इमारतीवरच काम करून इमारतीचे काम केले जात असल्याने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या सरंक्षक भिंतीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केले आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धर्मशाळा बांधण्यात आली आहे. या धर्मशाळेमुळे पर्यटक आणि शैक्षणिक सहलीच्या राहण्याची सुविधा होत होती.

गेली कांही वर्षापसून धर्मशाळेच्या दुरुस्तीकारिता निधी नसल्याचे कारण देत हि धर्मशाळा पडीक अवस्थेत ठेवण्यात आली होती. आता याठिकाणी रायगड प्राधिकरण विविध विकासात्मक कामे करत आहे. त्यामध्येच या धर्मशाळेची देखील दुरुस्ती केली जात आहे.

मुळातच अनेक वर्षापूर्वीची हि इमारत सुस्थितीत असली तरी वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. किल्ले रायगड संवर्धनातील विविध कामांना सुरवात झाल्यानंतर धर्मशाळेची देखील दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.

या इमारतीच्या परिसरात शौचालय आणि स्वच्छतागृह, सरंक्षक भिंत उभी केली आहे. अद्याप स्वच्छतागृहाचे काम अर्धवट अवस्थेत आहे तर मूळ इमारतीच्या छपराचे काम देखील अपूर्ण आहे. इमारतीचा मूळ ढाचा तसाच ठेवून वरील छपरावरील काम केले जात आहे.

या इमारतीच्या सरंक्षक भिंतीचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले असून दोन ठिकाणी हे काम ढासळले आहे. आधीच पाचाड मध्ये पाण्याची टंचाई असल्याने या कामाला पुरेसा पाण्याचा वापर झाला नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.

मूळ इमारत तोडून पुन्हा नव्या इमारतीची उभारणी करणे आवश्यक होते मात्र तसे न करता जुन्या इमारतीवरच काम करून लाखो रुपयाचा चुराडा केला जात असल्याचे देखील ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

किल्ले रायगडावर प्रतिवर्षी लाखो शिवभक्त भेट देत असतात. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात. या शैक्षणिक सहलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना खाजगी हॉटेल मध्ये राहणे न परवडणारे आहे यामुळे या धर्मशाळेचा विद्यार्थी आणि शिवभक्तांना राहण्यासाठी सोयीस्कर होते.

शिवाय विविध छोटे कार्यक्रम देखील यामध्ये केले जात होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हि धर्मशाळा निधी आणि कर्मचारी अभावी गेली अनेक वर्ष धूळ खात पडून राहिली.

यामुळे याठिकाणी पाणी, स्वच्छता, आणि वीजेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे देखभाल दुरुस्ती होत नसल्याने पडून राहिलेल्या धर्मशाळेची दुरुस्ती रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून केली जात आहे.

ज्या रायगड प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली रायगड संवर्धनाचे काम केले जात आहे त्या रायगड प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. रायगड किल्ल्यावर नोव्हेंबर पासून शैक्षणिक सहली सुरु होतात. तर पावसाळी पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात.

यामुळे पर्यटक आणि शैक्षणिक सहलीतील मुलांचा विचार रायगड प्राधिकरणाने करणे आवश्यक होते मात्र याठिकाणी प्रशासन देखील रायगड प्राधिकरणाच्या कामात कोणतीच सूचना करत नसल्याचे दिसून येत आहे.

मूळ इमारत तोडून वाढत्या पर्यटकांचा विचार करून नव्या पद्धतीने इमारत बांधणे अपेक्षित होते मात्र जुन्या इमारतीवरच काम करून रायगड प्राधिकरण पैसे वाया घालवत आहे. तसेच सरंक्षक भिंत देखील निकृष्ट पद्धतीची झाली आहे. – जयेश लामजे, स्थानिक ग्रामस्थ सदर काम प्लान नुसार होत असून छपराचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. मूळ इमारत मजबूत असल्याने केवळ वरील काम केले जात आहे – स्वप्नील बुर्ले, शाखा अभियंता – रायगड प्राधिकरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here