@maharashtracity

मुंबई: मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (SRA) अंतर्गत झोपडपट्टीच्या जागेवर पुनर्विकास (redevelopment) करून उभारण्यात आलेल्या एसआरए इमारतीत तेच रहिवाशी राहत असतात. त्यामुळे त्यांना त्या इमारतीत आवश्यक नागरी सेवासुविधा (civic amenities) देण्यासाठी नगरसेवकांचा निधी वापरण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत (BJP Corporator Abhijeet Samant) यांनी केली आहे.

मुंबईत नगरसेवकांना झोपडपट्टी परिसरात आपला विकास निधी वापरून रस्ते, शाळा, उद्यान, मैदान, शौचालये आदी ठिकाणी नागरी विकास कामे करता येतात. मात्र झोपडपट्टीच्या जागेवर कालांतराने उभारण्यात आलेल्या एसआरए इमारतीच्या ठिकाणी नगरसेवकांना आपल्या निधीतून आवश्यक नागरी कामे करण्यास मनाई आहे. त्यामुळे एसआरए इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या विविध नागरी सेवांपासून वंचित राहावे लागते.

तसेच, विकासकाने (developer) या एसआरए इमारतीत दिलेल्या पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण वाहिनी, सांडपाणी व्यवस्था या निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्यांची दुरुस्ती करणे रहिवाशांना आर्थिकदृष्ट्या अशक्य व अडचणीचे होते.

तसेच, या एसआरए इमारतीमधील रहिवाशी पालिकेला पाणीपट्टी, विविध करांचा भरणा नियमित करीत असताना त्यांना पालिकेच्या विविध नागरी सेवासुविधांपासून वंचित राहावे लागणे चुकीचे आहे.

यास्तव, एसआरए इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण वाहिनी, सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक निधीचा (corporator fund) वापर करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here