पालिका आयुक्तांसह शिवसेनेवर कॉंग्रेसने साधला निशाणा

आयुक्तांनी काँग्रेसला संपविण्याची सुपारी घेतल्याचा आरोप

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC polls) काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण लॉटरी (ward reservation) सोडतीमध्ये व त्यापूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेतही काँग्रेसच्या (congress) माजी नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. निवडणूक विभागाने अगोदर नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना व नंतर प्रभाग आरक्षणही नियम डावलून केले असल्याने या प्रभाग आरक्षणाबाबत काँग्रेस हरकती व सूचना निवडणूक विभागाला देणार असून त्यावर न्याय न मिळाल्यास कॉंग्रेस न्यायलयात दाद मागणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पालिकेला दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत अगोदरच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी आमच्या नगरसेवकांनी हरकती व सूचना मांडल्या होत्या. मात्र त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. मात्र आता मंगळवारी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण लॉटरी सोडतीमध्येही काँग्रेसच्या २९ पैकी २१ माजी नगरसेवकांना फटका बसला आहे.

आमच्या २९ माजी नगरसेवकांपैकी २१ माजी नगरसेवकांचे प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाले असून हा योगायोग होऊ शकत नाही. तसेच, निवडणूक संबंधित कायद्यातील मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आलेली नाही. पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सुपारी घेऊन कॉंग्रेसला संपविण्यासाठी हा डाव खेळला आहे, असा गंभीर आरोप पालिका आयुक्त चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्यावर केला आहे. त्यामध्ये शिवसेनाही (Shiv Sena) सहभागी असल्याचा गंभीर आरोप भाई जगताप यांनी केला.

प्रभाग आरक्षण लॉटरी सोडतीत आमचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा व माजी नगरसेवक बब्बू खान, आश्रफ आजमी आदी नगरसेवकांच्या प्रभागात अनुसूचित जाती, जमातीसाठी प्रभाग आरक्षित करताना जेथे त्यांची लोकसंख्या जास्त आहे तेथे ते आरक्षण न देता जेथे कमी लोकसंख्या आहे ते प्रभाग आरक्षित केल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला आहे.

प्रभाग क्रमांक १९०, १९२, १९४ आदिमध्ये हे नियमबाह्य व गंभीर प्रकार घडल्याचा दावा भाई जगताप यांनी यावेळी केला. या प्रभाग आरक्षणात, शिवसनेच्या ९७ पैकी २२, भाजपच्या ८४ पैकी १८ ते १९ प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. मात्र काँग्रेसचे २९ पैकी २१ प्रभाग आरक्षणाचा फटका बसला आहे, असे भाई जगताप यांनी सांगितले.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी, त्यांचा प्रभाग २०१२ च्या निवडणुकीत ओबीसी महिला होता तर आता नवीन प्रभाग आरक्षण सोडतीत तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मात्र, प्रभाग रचना यावेळी काढताना नव्याने रचना करणे अपेक्षित होते. तसे निवडणूक विभागाने केलेले नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्व बाजूला ठेवत ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून आयुक्तांनी चूक केली असल्याचा आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here