दिव्यांग आणि नोकरदार महिलाना अर्थसंकल्पात दिलासा

By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: सन २०२३-२४चा अर्थसंकल्प सादर करताना महिला व दिव्यांगांना व्यवसाय कर आकारणी करताना दिलासा देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले. राज्याचे कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट दोन लाख ९८ हजार १८१ कोटी एवढे निश्चित केले असून विविध उपाययोजनांमुळे ते पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्री फडणवीस म्हणाले, नोकरी करणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयेपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा २५ हजार करण्यात येत आहे. तितके वेतन असणाऱ्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. तसेच व्यवसाय कर अधिनियमामध्ये दिव्यांग व्यक्तीची व्याख्या, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे त्या करातून सूट मिळण्यास पात्र दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल.

फडणवीस म्हणाले, विमान चालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर बृहन्मुंबई मनपा, पुणे मनपा तसेच रायगड जिल्हा क्षेत्रात २५ टक्केवरून १८ टक्के करण्याचे प्रस्तावित करीत आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र कर,व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकी तडजोड योजना-२०२३, ही अभय योजना जाहीर करीत आहे. याचा कालावधी १ मे,२०२३ ते ३१ऑक्टोबर २०२३ असा असेल.

थकबाकीदार व्यापारी वर्गाला दिलासा जाहीर करताना ते म्हणाले, दोन लाख रुपयेपर्यंत थकबाकी असल्यास त्या वर्षासाठी ती रक्कम पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. याचा लाभ साधारण एक लाख प्रकरणात लहान व्यापारी वर्गाला होईल. पन्नास लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी थकबाकीच्या वीस टक्के भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेस माफी मिळेल. याचा लाभ ऐंशी हजार प्रकरणात मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here