By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: देशाच्या वस्तू सेवा कर संकलनात महाराष्ट्र राज्य एक लाख अठरा हजार कोटी रुपये इतका वाटा उचलून प्रथम क्रमांकावर तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना दिली.

राज्याची अर्थव्यवस्था स्थिर आहे, असा ठाम दावाही त्यांनी केला. अर्थमंत्री म्हणाले, सकल राज्य उत्पन्न तुलनेत राजकोषीय तूट तीन टक्केच्या आत असली पाहिजे. आपण त्या मर्यादेत आहोत आणि २०२३-२४ यावर्षी ती २.४६ टक्के इतकी राहील.आमच्या काळात पंचामृते आहेत, तुमच्या काळात कोणते अमृत होते? असा टोलाही त्यांनी विरोधी बाकावरील सडस्यांकडे पाहून माजी अर्थमंत्री अजित पवार यांना लगावला. या सरकारमध्ये शिवसेनेची संख्या ४० सदस्य इतकी आहे. तरी त्यांना ३४ टक्के निधी दिला. तेच तुमच्या काळात ५६ इतक्या संख्येने सर्वाधिक असताही राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वात जास्त निधी, त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना सदस्यांना फक्त १५ टक्केच दिला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

फडणवीस यांनी यावेळी संकल्पित शिवस्मारक आणि इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये इतकी तरतूद केल्याचे स्पष्ट केले. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १५ वर्षात तुम्ही एक इंचही जागा मिळवली नाही. केंद्रात मोदी सरकार आल्यावर आपल्या विनंतीवरून पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार तीन दिवसांत तीन हजार कोटींची जागा तीन दिवसांत हस्तांतरित झाली, अशी आठवण फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here