केवळ पुतळा नको तर लोकोपयोगी विचारपीठ व्हावे
स्व दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मांडली संकल्पना
मुंबई
हिंदुहृदयसम्राट (HinduHrudaySamrat) ही उपाधी केवळ ज्यांनाच शोभून दिसते असे एकमेवाद्वितीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना शिवसैनिकासह सामान्य माणसाचे अतोनात प्रेम लाभले. बाळासाहेब यांच्या खालोखाल शिवसैनिकांनी ज्यांच्यावर प्रेम केले ते स्वर्गीय श्रीमंत आनंद दिघे (Anand Dighe). हिंदुहृदयसम्राट या उपाधीप्रमाणेच श्रीमंत ही उपाधी शिवसैनिकांनी (Shiv Sainik) दिलेली आहे. त्याच आनंद दिघे यांचा २७ जानेवारी हा जयंती दिन. लोकोत्तर सेवा पूर्ण करता-करता आनंद दिघे अर्ध्यावर डाव सोडून गेले त्यालाही आता १९ वर्षे झाली. उठसूट आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्या ठाण्यातील (Thane) त्यांच्या शिष्यांना या कालावधीत एक स्मारक (memorial) बांधावे असे वाटले नाही, याची खंत जशी सामान्य शिवसैनिकांना आहे, तशीच ती दिघे यांचे पुतणे आणि ठाणे-बांद्रा येथील पक्ष नेत्यांकडून सक्रिय राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर केले गेलेले केदार दिघे (Kedar Dighe) यांनाही आहे. तुमच्याकडून होत नसेल तर तसे सांगा, स्व दिघे यांच्यावर प्रेम करणारे लाखो शिवसैनिक आहेत, त्यांच्या बळावर हे स्मारक उभे करू, असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे. हे स्मारक म्हणजे केवळ पुतळा नसेल तर दिघे यांच्या कार्याला साजेसे लोकोपयोगी केंद्र असेल, असे केदार दिघे यांनी thenews21 शी बोलताना स्पष्ट केले.

केदार यांच्या बोलण्यात खंत दिसली. स्थानिक नेते, विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री (guardian minister) आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल नाराजी दिसली. “मला आमदार (MLA) व्हायचे नाही, खासदारही (MP) व्हायची इच्छा नाही. नगरसेवक (Corporator) तर नकोच. हे मी शिंदे यांच्याकडे स्पष्ट केले आहे. तरीही त्यांना वाटते, मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोकादायक ठरू शकतो. या संशयातून स्व दिघे साहेबांच्या स्मारकाकडे शिंदे यांचे दुर्लक्ष होते आहे,” अशी खंत केदार दिघे यांनी व्यक्त केली.
ज्यांनी स्व दिघे यांना बघितलेले नाही, अशी नव्या पिढीतील तरुणाई देखील आनंद दिघे यांच्याबद्दल आदर ठेवून आहे. ज्या काळात दिघे वावरले, त्या काळातील त्यांचे शिष्य आज ठाण्याच्या राजकारणात मोठे झाले तर काहींना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ठाण्यातील कुठलीही निवडणूक असो किंवा शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात स्व आनंद दिघे यांचे स्मरण केले जातेच. त्याशिवाय मत मिळत नाही, हे इथल्या नेत्यांना पुरते ठाऊक आहे. “हे खरे असले तरी ठाण्यातील स्वार्थी नेत्यांनी स्व दिघे हे नाव आता केवळ मते मागण्यापूरते मर्यादित करून ठेवले आहे आणि याचे मला जास्त वाईट वाटते. केवळ तसबीरीला हार घातला म्हणजे स्व दिघे यांचा वारसा चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नाही. त्यासाठी आनंद दिघे यांच्यासारखी लोकसेवा करावी लागते,” असे परखड मत केदार दिघे यांनी मांडले.

दिघे म्हणाले, दिघे साहेबांचे ठाणे परिसरात कायमस्वरूपी स्मारक असावे अशी आपली कल्पना आहे. पण, स्मारक म्हणजे केवळ पुतळा नव्हे. पुतळा असेलच पण त्याहीपेक्षा त्या परिसरात एक अद्ययावत हॉस्पिटल (hospital), सुसज्ज ग्रंथालय (library), उच्च शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था, सैनिकी शाळा (military school) असेल. याचा उपयोग रुग्णांना स्वस्त दरात वैद्यकीय उपचार (medical facility) उपलब्ध करून देणे, गरीब आणि गरजू मुलांना अल्प शुल्क आकारून उच्च शिक्षण (higher education) उपलब्ध करून देणे हा असेल. महाविद्यालयात डोनेशन नसेल आणि रुग्णालयात छुपे खर्च नसतील, असे केदार दिघे सांगतात. या स्मारकाला केदार यांनी आनंद विचारपीठ असे नाव दिले आहे.
या सर्व सुविधा स्वस्तात उपलब्ध करून देतांना या परिसराचा आणि सुविधांचा खर्च कसा भागवला जाईल, या प्रश्नावर केदार दिघे म्हणाले, या स्मारक परिसरात काही सभागृह असतील, अँफिथिएटर (Amphitheatre) असेल, जे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाईल आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून स्मारक आणि इथे देण्यात येणाऱ्या सुविधांचा खर्च भागवला जाईल.
केदार दिघे यांच्या संकल्पनेतील या लोकोपयोगी स्मारकासाठी किमान पाच एकर जागेची आवश्यकता आहे. ठाणे महापालिकेत (TMC) वर्षानुवर्षे स्व आनंद दिघे यांचे नाव घेऊन सत्तास्थानी बसणारी शिवसेना आहे. राज्याचे मुख्यमंत्री (CM) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याकडेच नगर विकास (Urban Development) विभाग आहे. केदार दिघे म्हणतात, “या नेत्यांची मनापासून इच्छा असेल तर विकासकांना (builder/developers) भूखंड (land) उपलब्ध करून देणारी ठाणे मनपा, स्व दिघे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकेल. या स्मारकाला किमान १०० कोटी रुपयांची आवश्यकता असेल. सरकार (government) आणि महापालिका यातील काही भार उचलणार असेल तर उत्तम. नसेल तर स्व आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि शिवसैनिक आहेत, ते आपापल्या परीने मदत करायला तयार आहेत.”

केदार म्हणतात, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे दुर्लक्ष करतील, त्यांना टाळून हे स्मारक उभे करणारच. या निमित्ताने ठाणेकर जनतेलाही बघायला मिळेल की आनंद दिघे यांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर करणारे कोण आणि कोण खरोखरच त्यांच्यावर अजूनही प्रेम करतात.