Twitter : @NalavadeAnant

मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. सगळ्यात आधी शिवसेनेमधून बंडखोरी करत एकनाथ शिंदेसह काही आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र या सगळ्याला वर्ष उलटताच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील फुट पडली. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व घडत असताना आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षातही लवकरच फूट पडणार असल्याची माहिती मंगळवारी येथे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar is likely to form a separate group in SSS) हे दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तुपकर हेही राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करणार असल्याची चर्चा जोर धरू लगली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. मात्र या बैठकीला स्वाभिमानीचे नेते तुपकर जाणार नसल्याची माहितीही यानिमित्ताने समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका देखील केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख या नात्याने राजू शेट्टी यांच्याकडून तुपकर यांचे नेतृत्व जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून याला तुपकर यांनीही दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणाले होते. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. यानंतर आता तुपकर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here