By Dr Jitendra Awhad 

Twitter: @AwhadSpeaks

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पोटनिवडणूकीचे निकाल काल लागले. ही निवडणूक चुरशीची होणार हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं. पण, मी जे म्हणत होतो…मी आजही ठाम आहे की, महाराष्ट्राचे पुढचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे ठरवणारी ही निवडणूक असेल. राजकारणाचा विचार करताना त्याच्यातील निर्माण झालेले Dynamics हे समजून घेण्यासारखे असतात. सत्ताबदल करताना वापरलेले तंत्र हे तसे देशाच्या लोकशाहीत आणि महाराष्ट्रात नवीन होते इतक्या उघडपणाने भाव लावून आमदार विकत घेणे हे महाराष्ट्राने कधी अनुभवले नव्हते. पण, सर्वसामान्यांमध्ये राजकारणाचा झालेला खरेदी विक्री संघ हा चर्चेचा विषय झाला. आपली मतं आमदार घेतो आणि स्वत:ला विकतो हे मात्र लोकांच्या मनात चीड आणणारे होते. कोण एकत्र आले, कोण एकत्र नाहीत हे सगळं बाजूला ठेवूयात. मात्र, जनता एकत्र आली आणि सत्य उघड केले. मतदाराला कुणीही विकत घेऊ शकत नाही.

1977 सालातील इतिहास तपासून बघा. सत्ता लोकांची गळचेपी करीत आहे असे जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा जनता शांत बसली. फरक एवढाच होता की, तेव्हा वृत्तपत्रे हे स्वतंत्र मनाने लिहीत होती, व्यक्त होत होती. उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळातील वृत्तपत्र सम्राट रामनाथ गोयंका जे इंडियन एक्सप्रेस चालवत होते; त्यांनी आणीबाणी विरुद्ध आणि इंदिरा गांधींविरुद्ध आवाज उचलला. एक दिवस अख्खा लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हा कोऱ्या पानांनी भरलेला घरात आला आणि त्यांनी आपल्या भाषेत निषेध नोंदवला. लोकांमध्ये हळुहळु राग निर्माण झाला. वरवर दिसत काहीच नव्हतं. पण, लोकांमध्ये भावना तयार होत होती की, जे काही चालू आहे आता, राज्यव्यवस्थेमध्ये ते लोकशाही विरोधी आहे, असे जनतेचे मत झाले.

ज्या संस्था इंदिरा गांधींनी निर्माण केल्या होत्या त्यामधील एक महत्वाची संस्था होती IB (Intelligence Bureau). त्या IB ने इंदिरा गांधी यांना सांगितले की, वातावरण चांगले आहे, निवडणूका घ्या, तुमचा विजय निश्चित आहे. इंदिरा गांधींच्या पक्षाचा नाही तर इंदिरा गांधींचाही पराभव झाला, त्यांचा मुलगा संजय गांधींचाही पराभव झाला. इंदिरा गांधींसोबत असलेले मातब्बर नेते त्या निवडणूकीत हरले.

याचा अर्थ लोक बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरु नये. लोक स्वतंत्र विचार करतात. कदाचित व्यक्त होत नसतील. पण, व्यक्त होण्यासाठी संधी पाहत असतात. यामध्ये रोजगार उपलब्ध नाहीत, महागाई वाढत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली नाही, ह्या सगळ्या बाबी जरी एकत्र केल्या, तरी आपल्या मतांची खरेदी विक्री होते हे लोकांना मान्य होत नाही. लोकशाहीची गळचेपी होते आहे हे जनतेला चीड आणणारे असते. कसब्यात आणि चिंचवडमध्ये 70 खोके वाटले हे अगदी उघडपणाने लोक चर्चा करत होते. त्याचा परिणाम असा झाला की, लोक हा विचार करायला लागले की आता राजकारणात ही परिस्थिती आली आहे; की, करोडो वाटा आणि अख्खा मतदारसंघ विकत घ्या. 

मतदार संघातील प्रत्येक मतदार हा स्वत:चं मत विकायला तयार नसतो. तुम्ही गरीबांची मते विकत घेऊ शकता, हा जो प्रचार झाला, त्यामुळे गरीब, झोपडपट्टीवासीय, मागासवर्गीय अजून चिडले. की, हिम्मतच कशी होते यांची मतं आम्ही विकत घेऊ शकतो अशी भाषा बोलण्याची. आणि सगळे एक झाले.

कसब्यात कुठेही जातीपातीचं राजकारण झाले नाही. किंबहुना ब्राम्हणांना गृहीत धरु नका असा स्पष्ट संदेश कसब्याच्या मतदारांनी दिला. चिंचवडमध्ये जर कलाटे उभे राहिले नसते तर काटेंचा विजय निश्चित होता. सहानुभूतीची लाट असून देखिल काही मतांनी काटेंचा पराभव झाला आणि त्याला कारणीभूत कलाटे ठरले. राहुल कलाटे आणि काटेंची मते एकत्रित केली तर ती जगताप यांच्यापेक्षा जास्त आहेत. किंबहुना कलाटे लढले नसते तर काटे हे 20 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले असते. कारण, सगळ्यांचा एकत्र प्रयत्न तिथे झाला असता आणि काटेंना अधिक मते तिथे मिळाली असती.

याचा अन्वयार्थ एवढाच आहे की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये राजकारणात सुरु असलेली खरेदी विक्री ही लोकांना अजिबात आवडलेली नाही आणि त्यांनी पुढील दिशा काय असेल महाराष्ट्राची, हे त्यांनी मतांद्वारे दाखवून दिले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये उंदरांसारख्या उड्या मारणाऱ्या नगरसेवकांना हा धोक्याचा इशारा आहे. आपला पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात जाऊन आपण जिंकू शकतो, अशी जी भावना राजकारण्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे; ती पुण्याच्या जनमाणसाने उधळवून लावली आहे.

खरतरं पुण्याचे आभारच मानायला पाहिजे. कारण, पुण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवून दिली आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे दाखवून दिले. पैसा देउन मतदाराला विकत घेऊ, त्याची ही एक किंमत आपण ठरवू हा भ्रम मतदारराजाने उधळून लावला. 

लोकशाही आणि महाराष्ट्राची इभ्रत वाचवल्या बद्दल पुणेकरांचे लाख लाख आभार!

“पुण्यात नाही चालले खोखे 

काल पासून गायब आहेत बोके”

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here