Twitter: @maharashtracity
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यापासून पक्षात अस्वस्थता आहे. पवार आपला निर्णय मागे घेणार नाहीत हे अजित पवार यांनी कालच जाहीर केल्यानंतर पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी सध्या तरी दोन नावात चर्चा आहे – ती नावे आहेत – सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल.
पवारांचा राजकीय वारसदार कोण यावरून पक्षामध्ये अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात त्यांना रस नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी अनेकांच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचे देशभरातील अन्य पक्षातील लोकांशी उत्तम संबंध असायला हवेत, हा प्रमुख निकष असेल. या निकषात सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल दोघेही बसतात. तिसरे नाव छगन भुजबळ यांचे आहे. आज त्यांच्या नावाची चर्चा नसली तरी इतर मागासवर्गीय समाजाला घेऊन भुजबळ यांनी देशभर प्रचंड मोठ्या सभा गाजवलेल्या आहेत. राजस्थान, बिहार येथील त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अनेक राज्यातील ओबीसी नेत्यांशी भुजबळ यांचे वैयक्तिक संबंध आहेत.
Also Read: उद्धव जी, तुमचा अभिमन्यू होण्याआधी कोषातून बाहेर पडा!
सलग तीन वेळा लोकसभेचे नेतृत्व करणाऱ्या आणि एकदा राज्यसभेचे नेतृत्व करणाऱ्या सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. पवारांसोबत दिल्लीत वावरताना सुप्रिया सुळे यांनीही देशभरातील अनेक नेत्यांशी उत्तम संबंध स्थापित केले आहेत. भाजपेतर पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना याचा निश्चित फायदा होऊ शकेल.
प्रफुल पटेल यांनी चार वेळा राज्यसभा तर तीन वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. ते सलग सात वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. जागतिक फुटबॉल संघटनेचे नेतृत्व केलेल्या पटेल यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगले संबंध आहेत. पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. मात्र, इक्बाल मिरची प्रॉपर्टी प्रकरणात प्रफुल पटेल यांची सक्तवसुली संचलनालयाने अनेक वेळा चौकशी केली आहे. हा एक डाग त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर असल्याने कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद होण्याची शक्यता आहे. हाच निकष लावला गेला तर छगन भुजबळ देखील या शर्यतीतून बाद होतील.
भारतीय राजकारणातील सत्ता संघर्ष बघितल्यास नेत्यांनी आपल्याच रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेवाईकांना पुढे वारसदार केल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. कदाचित हाच कित्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील गिरवला जाऊ शकतो आणि सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकेल, अशी शक्यता आहे.