@maharashtracity

महापौरांच्या दालनासमोर भाजपची निदर्शने, घोषणाबाजी

प्रसूतीगृहात अतिदक्षता विभाग चालक खासगी संस्थेवर कारवाईची मागणी

डॉक्टर, संस्थेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा परवाना रद्द करा

मुंबई: भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या (BMC) सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील नवजात शिशूसाठी कार्यरत अतिदक्षता विभागात (ICU) शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) जीवघेणे इन्फेक्शन होऊन ‘सेफ्टीक शॉक’मुळे ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ बालके व्हेंटिलेटरवर आहेत, असा गंभीर व खळबळजनक आरोप भाजपतर्फे (BJP) पालिका गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी केला आहे.

मात्र, या गंभीर घटनेप्रकरणी भाजपच्या नगरसेविकांनी आवाज उठवूनही पालिका प्रशासन व आरोग्य खात्याने कोणतीही कारवाई केली नाही. महापौर व आरोग्य मंत्री यांनीही घटनास्थळी भेट दिली नाही, असा आरोप करीत भाजपच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या दालनासमोर संताप व्यक्त करीत आणि हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले.

या प्रसूतीगृहातील अतिदक्षता विभाग हा एका खासगी वैद्यकीय संस्थमार्फत चालविण्यात येतो. या संस्थेच्या व त्यांच्या डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १८ डिसेंबर रोजी शॉर्टसर्किट होऊन त्यामुळे जीवघेणे इन्फेक्शन होऊन ‘सेफ्टीक शॉक’मुळे (Septic shock) अनुक्रमे २०,२१ आणि २२ डिसेंबर रोजी ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, असा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला आहे.

अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या वैद्यकीय संस्थेकडून पालिकेने प्रसूतिगृहाची जबाबदारी काढून घ्यावी. तसेच, या संस्थेच्या विरोधात आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करण्यात यावा. या गंभीर घटनेला जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा परवाना रद्द करावा, अशी जोरदार मागणी भाजपच्या संतप्त नगरसेवकांनी केली आहे.

भांडुप येथील प्रसूतिगृहात गेल्या ४ दिवसांत पालिका प्रशासन व संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळेच ४ बालकांचा नाहक बळी गेला आहे. महापौर, सत्ताधारी हे राणी बागेतील ‘ पेंग्विन’वर कोट्यवधी रुपये खर्चून त्यांची जीवापाड काळजी घेतात मात्र रुग्णालये, प्रसूतिगृह येथील लहान बालकांच्या जीवाची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत, अशी टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here