@maharashtracity

By विजय साखळकर

करीमलाला आजच्या अंडरवर्ल्ड (Underworld) आणि त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होता आणि आजची कार्यपद्धती मर्दानी नसल्याचा त्याचा दावा त्यानं पिंकी विराणी (Pinky Virani) यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता.

त्यानं मांडलेला पहिला मुद्दा होता तो की त्यांच्या काळत राडेबाजी व्हायची ती मर्दानी होती. आतासारखी घाबरट नव्हती. त्यावेळी खूनखराबा आमने- सामने होत असायचा‌. हिसाब आमने-सामने व्हायचे. समोरासमोर येऊन एकमेकांवर हत्यारे चालविली जात. त्यामुळे होणाऱ्या जखमा मिरवल्या जात. गंभीर दुखापत असेल तर हाॅस्पिटलात उपचार घेतले जात. बदल्याची आग धुमसत राही आणि जखमी दादा किंवा त्याचे शागिर्द हल्लेखोराची पाळेमुळे शोधून त्याला गाठत आणि बदला घेत.

करीमलालाच्या (Karim Lala) मते ही मर्दानी पद्धत होती. नंतरचा म्हणजे पुढच्या पिढीचा काळ हा लबाडीचा राहिला असं करीमलाला म्हणतो. मुलाखतीत तो म्हणतो, कुणीतरी पंधरा- वीस फुटांवरून गोळ्या घालतं… धडाधडा … आणि बस्स! मामला खल्लास!! ही पद्धती करीमलाला याला भ्याड वाटे. तसा उल्लेखही त्यानं त्या मुलाखतीत केला आहे.

आता या मुलाखतीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर…..

करीमलाला ज्या पद्धतीचा गौरवपूर्ण उल्लेख करतो त्या पद्धतीतील हत्यारे आणि त्याचे कार्य पहा….

त्या काळात प्रचलित हत्यारे वापरली जात ती म्हणजे चाकू.. सुरे.‌. गुप्ती. तलवारी… मोठा चाकू ज्याला रामपुरी म्हटले जाई. ही हत्यारे पाहताच मनाची घालमेल होत असे.

रामपुरी चाकू केवळ रामपुरी या नावानंच ओळखला जायचा. या चाकूचं वैशिष्ट्य म्हणजे तो जवळून वार करूनही वापरता येत असे किंवा फेकूनही मारला जाऊ शकत असे. अनेकदा केवळ घाबरवण्यासाठी तो बाहेर काढला जात असे. या चाकुला खटके असत आणि रामपुरी उघडतावेळी होणारा प्रत्येक खटक्याचा आवाज समोरच्या माणसाला अर्धमेला करून सोडत असे.

खटाक…खटाक….खटाक…खटाक…खटाक….खटाक.. असे सहा खटके वाजायचे. तोपर्यंत जीवाचं पाणी पाणी होत असे. रामपुरीचा खटका वाजायलाच हवा असा नियम नव्हता. खटका असे तिथंच एक कळ होती. ती मोकळी ठेवली तर पातं खुलं होताना आवाज होणं किंवा खटके वाजणं बंद होत असे. मग तो कुठेही फेकून मारला जाऊ शकत असे.

यासारखीच आणखीही तीक्ष्ण हत्यारे त्या काळात होती. गुप्ती, वस्तरा, चाॅपर, तरवार अशा पारंपारिक हत्यारांबरोबरच पाकट या माशाची काटेरी शेपटीही मारामारीसाठी वापरली जात असे. यापैकी वस्तरा साधारणत: १९७० च्या अलीकडे पलीकडे गुन्हेगारांमध्ये लोकप्रिय ठरला होता. असं सांगतात की गुन्हेगारांनी वस्तरा वापरायला सुरुवात केली कारण नाकाबंदीत सापडल्यास घरी दाढी करण्यासाठी तो घेतला असा बचाव करता येई. पाकट या माशाला इंग्रजीत स्टिंगरे (Stingrays) असं म्हटलं जातं. त्याच्या शेपटीच्या फाटकाऱ्यात बोटी फोडण्याची क्षमता असे. वस्तरा आणि पाकटाची शेपटी यांच्या जखमा सहसा बऱ्या होत नाहीत, असं जाणकार सांगतात. वास्तऱ्याच्या जखमा एक वेळ बऱ्या होतात, फारच काळजी घेतली तर.. पण पाकटाच्या शेपटीच्या जखमा वरवर बऱ्या झाल्यासारख्या वाटतात, पण आतून चिघळत जातात आणि अवयव काढून टाकण्याची पाळी येते.

अर्थातच इतके भयंकर परिणाम साधणारी हत्यारं आणि त्या हत्याराने झालेले गेम करीमलाला मर्दानी समजतो. पण त्यामुळे हल्ला ज्यांच्यावर झालाय तो बरा होईपर्यंत वेदनानी तडफडत असतो. ही कसली मर्दानी पद्धत?

कोणीतरी येतो, पंधरा फुटांवरून गोळी मारतो, ज्याला गोळी मारायची आहे, त्याला माहीत नसतं, गोळी लागते, गेम खलास…. करीमलाला या पद्धतीला भ्याड म्हणतो. का?

करीमलाला यानंच मुंबईच्या भाडोत्री मारेकऱ्यांच्या हातात बंदूक दिली. युसूफ पटेल याच्यावरील हल्ल्यासाठी त्यानं अफगाणिस्तानातून दोन मारेकरी आणले. त्यांनी केलेल्या हल्ल्यातून युसूफ पटेल बचावला. करीमलालाच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वारस – त्याचा पुतण्या समद खान यानं पहिला खून गोळ्या घालून केला. दु्सरा वारस मलद खान चकमकीत मारला गेला. त्याच्याकडे रिव्हाॅल्वर होते. रहीम लालाची हत्या गोळ्या घालूनच केली गेली. त्यांना पटकन मरण आले ही त्याच्यासाठी असलेली शोकांतिका त्याच्या मनात रूजली नसावी ना?

एरवी करीम लालाच्या नावावर असणारं हाॅटेल त्याच्यानंतर त्याचा जावई चालवतो. त्याच्या जावयाच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची बातमी आली होती. करीम लाला आणि त्याची कारकीर्द हा सिनेमा क्षेत्रातील (film industry) मंडळींसाठी आकर्षणाचा विषय होता.

(विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वर्षे त्यांनी गुन्हेविषयक बातमीचे वार्तांकन केले आहे.)

(करीमलाला आणि सिनेमा: पुढील भागात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here