बेलार्ड पिअर ते सायन मार्गावर नवीन बसमधून प्रवाशांचा सुखद प्रवास

@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाने माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेस्ट उपक्रमात पर्यावरण पूरक ‘इलेक्ट्रिक बसगाड्या’ सुरू केल्या आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता बेस्टच्या बस ताफ्यात ‘ओलेक्ट्रा कंपनी’च्या ८ नवीन इलेक्ट्रीक बसगाड्यांचा समावेश झाला आहे. यापैकी एक नवीन बसगाडी बेलार्ड पिअर ते सायन या ६६ क्रमांकाच्या बस मार्गावर धावली. या बसमधून प्रवाशांनी सुखद प्रवासाचा आनंद लुटला.

बेस्ट उपक्रमाने पेट्रोल व डिझेलवरील प्रदूषण पसरविणाऱ्या बसगाड्या बंद करून त्या ऐवजी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात काही इलेक्ट्रिक बसगाड्या अगोदरच दाखल झाल्या आहेत. वास्तविक, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसगाड्यांची खरी संकल्पना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची आहे. त्यादृष्टीने बेस्ट उपक्रमाने आपल्या बस ताफ्यामध्ये आगामी काळात सर्वच बसगाड्या या इलेक्ट्रिक बस असतील, असे लक्ष्य ठेवले आहे.

त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा टप्प्या – टप्प्याने समाविष्ट केला जात आहे. बेस्टच्या बस ताफ्यात ‘ओलेक्ट्रा कंपनी’च्या ८ नवीन इलेक्ट्रीक बसगाड्या नव्यानेच दाखल झाल्या आहेत. या ८ पैकी एक नवीन बसगाडी सोमवारी बेलार्ड पिअर ते सायन या ६६ क्रमांकाच्या बस मार्गावर प्रवाशांना घेऊन धावली.

या एसी बसमधून प्रवाशांनी सुखद प्रवासाचा आनंद लुटला. या इलेक्ट्रीक बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या अत्यंत आरामदायी व पर्यावरणपूरक आहेत. १२ मीटर लांब ओलेक्ट्रा कंपनीची ही बस ५४ आसन क्षमतेची आहे. लवकरच इतर नवीन इलेक्ट्रिक बसगाड्याही रस्त्यावर धावताना दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here