By Atul Shrinivas Talashikar 

Twitter: @maharashtracity

परवा केबीसी पहात असताना अचानकपणे आनंद सिनेमामधील कहीं दूर जब दिन ढल जाए या गाण्याचा गायक कोण? असा प्रश्न अमिताभ बच्चनने विचारला. समोर बसलेला पाहुणा स्पर्धक होता अक्षयकुमार. बरोबर उत्तर आलं मुकेश. पण हे गाणं निमित्त होतं. साक्षात दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनने अक्षयकुमारला अरे तुझे सासरे काय चीज होते माहिती आहे का? अशा आविर्भावात अक्षयकुमारच्या सासऱ्याचे वर्णनच करायला सुरुवात केली. 

पुढं अमिताभ बच्चन म्हणतो असं अखिल भारतीय सुपरस्टारडम मी आजतागायत कोणाचं पाहिले नाही. मला त्याच्या बरोबर काम करायला मिळालं हे मी माझे भाग्य समजतो. अक्षयकुमार स्तिमित होऊन हे ऐकत असतो. पुढे त्या माणसाचं नाव अमिताभ बच्चन उद्गारतो आणि तो माणूस म्हणजे राजेश खन्ना…..

लोकांच्या टाळ्यांचा गजर कानात गुंजत राहतो. कुठेतरी आराधनाचे दिवस आठवतात. किशोरचा कोरा कागज या गाण्याच्या आधीचा आलाप हिमालयापार गुंजत रहातो. तो निळ्या कोटातील आणि आत घातलेल्या लाल पोलो मधील समस्त स्त्री वर्गाला प्रेमात पाडणारा तो चेहरा परत परत डोळ्यासमोर येत रहातो. एका क्षणासाठी वाटतं तेव्हा कदाचित शर्मिला टागोरच्या सुप्रसिद्ध खळ्या पण राजेशच्या प्रेमात असल्याचा भास तयार होतो. 

१९६९ हे वर्ष राजेश खन्नानं कायमचं हृदयाच्या कप्प्यात कुलूपबंद करुन ठेवलं असणार. भारताला राष्ट्रीय पातळीवर एक पहिला वहिला सुपरस्टार गवसला होता. इथून पुढची अभिनेता म्हणून असणारी त्याची वाटचाल ही स्वप्नवत होती. हात लावेन त्याचं सोनं करेन अशी फेज तयार झाली. लागोपाठ दो रास्ते, बंधन, द ट्रेन, सच्चा झूठा, सफर, खामोशी, आन मिलो सजना, कटी पतंग, आनंद, मेहबूब की मेहेंदी, अंदाज, हाथी मेरे साथी, मर्यादा, दुष्मन, अमर प्रेम, अपना देश, बावर्ची, दाग, नमक हराम, आप की कसम, प्रेमनगर, अजनबी, रोटी… शेवटी १९७५ च्या आसपास हे वादळ एकदाचं थांबलं. तोपर्यंत त्या पाच सहा वर्षांत एक अद्भुत युग अखिल भारतीय सुपरस्टारडमचे लोकांनी न भुतो न भविष्यती पाहिलं. आज राजेशचे समकालीन लोक आजी आजोबा झाले आहेत. आजही हे लोक राजेश खन्ना युग विसरली नसणार निश्चितच.

राजेश खन्नाचे डोळे कमालीचे भावूक आणि आवाज म्हणजे दैवी देणगी. शर्मिला टागोर आणि मुमताजनं त्याचा सुपरस्टारडमच्या फेजचा पडद्यावरील संसार जपला, फुलवला व कायमचा चिरंतन करुन ठेवलाय. इंडस्ट्रीत राजेश शक्ती सामंत व पंचम यांनाच जवळचे मित्र मानत असे तर किशोरकुमारला तो स्वतःचा आत्मिक समजत असे. १९७५ पासूनचा पुढचा राजेश व त्याचे सिनेमे हे १९६९-७४ पेक्षा सर्वस्वी भिन्न होते. खरंतर आराधना, कटी पतंग, अमरप्रेम, छोटी बहु, खामोशी, सफर, अंदाज असे कित्येक स्री प्रधान सिनेमे हे राजेशचे सिनेमे कधी झाले हे त्या निर्माण करणाऱ्याला पण समजले नाही. 

राजेशचा मुद्राभिनय कमाल सुंदर. आनंद, अमर प्रेम किंवा बावर्चीमधले शेवटचे सीन्स आठवले तरी राजेश किती मोठा अभिनेता होता हे समजतं. या मुद्राभिनयावर तर त्यानं कित्येक गाणी अक्षरशः खाल्ली आहेत. उदाहरणार्थ – मर्यादा मधलं जुबा पे दर्द किंवा सफर मधलं जिंदगी का सफर, तसंच आप की कसम मधलं जिंदगी के सफर में गुजर जाते… अनुरोध मधलं जब दर्द नही था सिनेमे किंवा पलकों की छाव में मधलं डाकीया डाक लाया ही यादी न संपणारी आहे. 

आजपर्यंत राजेश खन्नाबद्दल प्रचंड प्रमाणात लेखन झाले आहे. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, नवीन निश्चल, विनोद मेहरा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होते तेव्हा राजेश खन्ना प्रचंड मोठा सुपरस्टार होता. तेव्हा एक धर्मेंद्र कसाबसा सोडला तर शशी, संजीव, जितेंद्रची पण सोलो हीट फिल्म द्यायची धमक फार कमी होती. म्हणजे एकवेळ या बाकीच्या लोकांचे सिनेमे चालतील की नाही याची पण या खुद्द लोकांना शंका असावी इतका पडदा राजेशने व्यापला होता. 

आज काका हयात असता तर स्वीट एटीजमध्ये असता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लिहायला भरपूर काही आहे. पण आज तो क्षण नव्हे. समांतर सिनेमा करणारे भलेही स्वतः ला उच्च कोटीचे अभिनेते समजत असतील, पण सहजसुंदर अभिनय किंवा effortless acting या शब्दाची व्याख्या शोधायची असेल तर आनंद, बावर्ची एकदा तरी पहा, अंडरप्ले म्हणजे समजून घ्यायचं असेल तर नमक हराम, पलकों की छाव में पहा. Character मध्ये घुसणं पहायचं असेल तर अमरप्रेम, दुष्मन, अवतार, अमृत पहा. प्रत्येक रोल हा माणूस जगलाय, एका सारखा दुसरा अजिबात नाही. Action हा त्याचा प्रांत कधीच नव्हता. 

एखादं अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक त्याला मिळायला हवे होते. मृत्यू पश्चात पद्म पुरस्कार सरकारने देऊन त्याचा मरणोत्तर सन्मान केला. तो फेनाॅमेना म्हणूनच जन्माला आला होता. १९७०-७२ च्या आसपास तो अखिल भारतीय पातळीवर (दक्षिण भारत पकडून विशेषतः) लोकांना वेड लावत होता. कोणताही सोशल मीडिया नसताना आणि बरेच सिनेमे सोलो हीट देताना राजेश सुपरस्टार होता हे लक्षात घेणे आवश्यक आहे. बीबीसीला पण त्याच्यावर एक documentary करायची भुरळ पडली. मुंबई विद्यापीठात पण The Charisma of Rajesh Khanna हा निबंध अभ्यासाला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजेश खन्ना यांच्या लोकप्रिय असण्याची तुलना तत्कालीन मिडीयामध्ये छापली होती. त्याच्या रिटायरमेंट आणि लग्नाची ब्रेकींग न्युज अख्खा भारतभर पसरली होती. लग्न झाल्यानंतर कित्येक तरुणींनी आत्महत्या केल्याची दंतकथा सांगितली गेली. तरुणींनी आपल्या रक्ताने प्रेमपत्र लिहीली होती. तर त्याच्या पांढऱ्या रंगाची कार तरुणींनी चुंबन घेऊन लाल केली होती आणि त्याच्या फोटोशी लग्न केली जात होती.

एवढं सगळं झाल्यावर एकदा तो म्हटला होता की आता देव असल्यासारखं वाटतं. तर असा होता राजेश खन्ना. आज त्याचा ऐंशीवा वाढदिवस. आजपासून बरोबर पन्नास वर्षांपूर्वी त्याचं सुपरस्टारडम सिनेमाच्या कॅनव्हासवर धुमाकूळ घालत होते. 

माणसाच्या जन्माला येऊन स्टार असण्याच्या क्षेत्रात करिअर करताना सुपरस्टार पद मिळवताना अस्सल कसदार अभिनयाची कास जरा सुद्धा न सोडणं म्हणजे राजेश खन्ना. अशी अढळ ध्रुवपद फार कमी जणांच्या नशिबात असतात पण त्यात राजेश अग्रेसर होता व सदैव राहील.

खाली बरोबर ५० वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात स्क्रीनला राजेश खन्नाने दीर्घ मुलाखत दिली होती त्या मुलाखती दरम्यानचा एक फोटो देत आहे. १९७२ चा देखणा सुपरस्टार राजेश खन्ना नक्की पहा चित्रात…..

Happy Birthday to The Phenomenon 💐🎂

©️®️ अतुल श्रीनिवास तळाशीकर

            २९ डिसेंबर २०२२ 

(लेख जुना असला आणि आज राजेश खन्ना यांचा वाढदिवस नसला तरी या चिर तरुण अभिनेत्यावर लिहिलेला अप्रतिम लेख समाज माध्यमात दिसला आणि लेखकाच्या नावासह प्रसिद्ध करण्याचा मोह झाला. – संपादक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here