राज्यामध्ये नऊ वर्षात उष्माघाताचे ७६ बळी
Twitter: @maharashtracity
मुंबई: वाढत्या उष्म्याचा इशारा देण्यात आला असून मध्य भारतात सर्वाधिक उष्मा त्रास देणार असल्याचा अंदाज आहे. या मध्य भारतात महाराष्ट्राचा काही भाग येत असल्याने उष्म्याची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, राज्यामध्ये नऊ वर्षांमध्ये तब्बल १७९० नागरिक उष्णता विकाराने बाधित झाली असून, त्यातील ७६ नागरिकांचा आतापर्यंत बळी घेतला आहे. यात गतवर्षी म्हणजे २०२२ या वर्षात सर्वाधिक म्हणजे ३१ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
बदलत्या तापमानामुळे दरवर्षी उन्हाचा तडाखा वाढत असून यामुळे प्राणी, पक्षी यांच्याबरोबरच मनुष्यालाही जगणे अवघड झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे दरवर्षी वाढत्या उष्णता विकारांच्या रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. सन २०१५ पासून आतापर्यंत या नऊ वर्षामध्ये राज्यामध्ये उष्माघाताचे १७९० रुग्ण सापडले आहेत. तर यातील ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.
नऊ वर्षामध्ये उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू हे २०२२ मध्ये झाले आहेत. २०२२ मध्ये उष्माघाताचे ७६७ रुग्ण सापडले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक १३, जळगाव ४, अकोला ३, नागपूर ग्रामीण, जालना प्रत्येकी २, औरंगाबाद, परभणी, परभणी महानगरपालिका, अमरावती, भंडारा, उस्मानाबाद आणि हिंगोली प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सन २०२० आणि २०२१ ही कोरोनाची दोन वर्षे सोडली तर प्रत्येक वर्षी उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
उष्माघाताच्या रुग्ण व मृत्यूची आकडेवारी
राज्यात सन २०१५ मध्ये उष्माघाताचे २८ रूग्ण सापडले तर दोन जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये रुग्ण संख्या ६८६ वर पोहोचली तरी १९ जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये रुग्णसंख्येत घट होऊन २९७ रुग्ण उष्माघाताचे सापडले. मात्र, १३ जणांचा मृत्यू झाला. सन २०१८ आणि २०१९ मध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असली तरी जितके रुग्ण सापडले त्या सर्वांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये उष्माघाताचे दोन रुग्ण सापडले, तर त्या दोघांचाही मृत्यू झाला. तसेच २०१९ मध्ये ९ रुग्ण सापडले त्यांचाही मृत्यू झाला. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे उष्माघाताचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा उष्माघाताने उसळी घेतली. २०१३ मध्ये आतापर्यंत फक्त एकच रुग्ण सापडला आहे.
उपाय योजना
वाढत्या उष्माघाताचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून, सार्वजनिक रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांच्या उपचाराची सुविधा निर्माण करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. क्षेत्रीय पातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्याकडे क्षार संजीवनी, ग्लुकोज पावडर आणि पॅरासिटामॉल अशी आवश्यक औषधी उपलब्ध राहील, याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. उष्णता विकाराचे राज्य पातळीवरुन दैनंदिन स्वरुपात सनियंत्रण करण्यात येत असून दैनंदिन अहवाल राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात येत आहे.