@maharashtracity

महाड: इतिहास संशोधक डॉक्टर प्रेम हनवते यांच्या ‘महारांचा लष्करी इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (Dr Babasaheb Ambedkar National memorial) या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये झाले. या पुस्तकातून महारांची शौर्याची परंपरा नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरेल, असे हर्षदीप कांबळे (Harshdeep Kamble) यांनी स्पष्ट केले.

गेली अनेक वर्ष डॉ प्रेम हनवते (Dr Prem Hanavate) हे इतिहासातील विविध पैलू आपल्या लिखाणातून आणि संशोधनातून लोकांसमोर आणत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) निष्ठावंत मुस्लिम सैनिक या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्याचप्रमाणे त्यांनी महाडमधील दलित उद्धार चळवळीचे गोपाळबाबा वलंगकर यांच्या जीवनावर विस्तृत ग्रंथ नुकताच प्रकाशित केला होता.

त्यानंतर दिनांक 20 मार्च रोजी महाड सत्याग्रह स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये महारांचा लष्करी इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

समाजकल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे धम्मज्योती गजभिये, शाहीर संभाजी भगत, पुस्तकाचे लेखक प्रेम हनवते, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी घेण्यात आलेल्या माजी सैनिक मेळाव्यात महार रेजिमेंटच्या (Mahar Regiment) सैनिकांनी या पुस्तकाला मानवंदना देखील दिली.

या पुस्तकातून एक हजार आठशे वर्षाची आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय शौर्य पराक्रमाची शौर्यगाथा उलगडणार आहे. या संशोधन ग्रंथातून महार समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मराठेशाहीतील महार मावळे, ईस्ट इंडिया कंपनी काळातील महार सैनिकांचा पराक्रम, ब्रिटिश कालखंडातील पराक्रमी महार सैनिक, अस्पृश्यांच्या लष्कर भरतीसाठी झालेल्या चळवळी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महार रेजिमेंट स्थापनेतील योगदान, महार रेजिमेंट, महार सैनिकांची शौर्यगाथा, लष्करी पेशाचा दलित समाजावर झालेला परिणाम आदी विषयाची सविस्तर माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here