उत्पन्न वाढीसह, पाणीपुरवठा – आरोग्याच्या सुविधांवर भर

@maharashtracity

धुळे: धुळे महानगरपालिकेच्या (DMC) सन 2022-23 चा 586 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला (budget) बुधवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. यात शहराच्या प्रवेशाच्या रस्त्यांवर जागोजागी स्वागत कमानी, स्वच्छता, पाणी, रस्त्यांसाठी कोट्यावधींची तरतुद केली आहे. शिवाय, महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठीही अनेक योजना राबविण्यात येणार आहेत.

स्थायी समितीच्या सभेत बुधवारी महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. स्थायी समितीचे सभापती शितल नवले यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, सचिव मनोज वाघ, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

या अर्थसंकल्पात तापी पाणीपुरवठा योजना 30 वर्ष जुनी असून तिच्या दुरुस्तीसाठी पाच लक्षची तरतुद करण्यात आली आहे. सुकवद आणि बाभळे पंपींग स्टेशनसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये, वलवाडी जलशुध्दीकरण दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये, हद्दवाढ गावात नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळा आणि सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपये, छत्रपती शाहू महाराज चबुतरा आणि सुशोभिकरणासाठी 35 लाख रुपये, वीर एकलव्य यांच्या पुतळ्याच्या चबुतर्‍यासाठी 20 लक्ष रुपये तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी 20 लाख रुपये तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी चबुतरा उभारण्यात येणार असून त्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

देवपूरातील रस्त्यांसाठी सहा कोटी रुपये, दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये दवाखाने उभारणीसाठी एक कोटी रुपये, ज्येष्ठ नागरीकांच्या विरंगुळ्यासाठी ओपन स्पेसमध्ये सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

क्रिडा आणि कला क्षेत्रासाठी 50 लाख तर शहरात स्वागत कमानीसाठी 75 लाखांची तरतुद करण्यात आली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जीआय सीस्टीमचा (GI System) उपयोग करुन मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरी भागात 60 ते 70 हजार नवीन मालमत्ताधारक (property tax payers) आढळून आले असून त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात 70 ते 75 कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here