@maharashtracity

By विशेष प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या राजकारणात आजवर कॉंग्रेस विरुध्द भाजपा असाच सत्तासंघर्ष झाला. यावेळच्या निवडणूकीत मात्र, भाजपविरुध्द राष्ट्रवादी अशीच थेट लढाई होईल, असे चित्र भासविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरु केला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस ॲक्टीव्ह तर राष्ट्रवादी मिशन मोडवर काम करीत आहेत. (Congress active whereas NCP is in Mission mode) किसमे कितना दम है! हे मात्र, सहा महिन्यानंतरच (निवडणूकीनंतर) सोलापूरकरांना कळेल.

अवघ्या चार महिन्यांवर सोलापूर महानगर पालिकेची निवडणूक (Solapur Corporation polls) येऊन ठेपली आहे. हातातून गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष ॲक्टीव्ह मोडवर येऊन काम करीत आहे. कॉंग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण, राज्यातील टॉप आमदारांपैकी एक असलेल्या आमदार प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आहे. महापालिकेवर पुन्हा बहुमताने कॉंग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावून राज्य पातळीवरील नेतृत्व सिध्द करण्यासाठी आ. प्रणितींना खूपच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Former CM Sushilkumar Shinde) यांनी देखील सोलापूरच्या राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सोलापूरात घडणाऱ्या बारीक-सारीक गोष्टींची माहिती तात्काळ शिंदे यांच्यापर्यंत पोहचविली जात आहे.

एकेकाळी माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे यांच्यासह चाकोते परिवाराची शहराच्या राजकारणावर चांगली पकड होती. आता माने हे शिवसेनेत (Shiv Sena) तर कोठे राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना कॉंग्रेस कमकुवत झाली आहे. महेश कोठे यांचे कॉंग्रेस सोडणे, देशातील मोदी लाट (Modi wave), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सोलापूरच्या वाट्याला आलेली दोन मंत्रीपदे आणि भाजपाने केलेल्या आश्वासनांच्या खैरातीमुळे कॉंग्रेसला महापालिकेतील सत्ता गतवेळी गमवावी लागली होती.

सोलापूर शहरात माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या रुपाने भाजपाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे निवडणूकीत भाजपाचेच पारडे जड राहणार आहे.

आ. प्रणिती शिंदे यांनी राज्यातील सत्तेचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी करण्याचा सपाटाच लावला आहे. शहरात ठिकठिकाणी विकासकामांचा शुभारंभ, वॉर्डनिहाय बैठका, घराघरात कॉंग्रेसचे विचार पोहचविण्याचे उपक्रम सहकार्यांसमवेत सुरु केलेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, युवा अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेवक विनोद भोसले यांनी शहरात भाजपाच्या विरोधात रान पेटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. महापालिका निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाची संपूर्ण मदार शिंदे कुटूंबियांवरच असणार आहे.

सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणिती शिंदे यांना काहीही करुन महापालिकेवरील सत्ता पुन्हा मिळवावीच लागणार आहे. तरच आगामी निवडणूकांमध्ये कॉंग्रेसला फायदा होईल. शिवाय जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद वाढण्यासही मोठी मदत मिळणार आहे.

आजवर महापालिकेच्या सत्तेसाठी कॉंग्रेस विरुध्द भाजपा असाच संघर्ष झाला आहे. परंतु या निवडणूकीत खरा सामना भाजपा विरुध्द राष्ट्रवादीच (BJP versus NCP) राहील, असे चित्र भासविण्याचा अटोकाट प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना नेऊन त्यांना बळ देण्याचा सपाटा लावला आहे.

त्यातच संतोष पवार यांनी आता वॉर्ड चलो अभियान सुरु केले आहे. त्याला शहरातून उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात फारसे लक्ष न देता छुप्या पध्दतीने महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. माजी महापौर महेश कोठे, एमआयएम (MIM) नेते तौफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi – VBA) नेते आनंद चंदनशिवे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील जुन्या व नव्या नेते व कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांचे बळ मिळत आहे.

आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत आणून महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी संतोष पवार यांनी पालकमंत्री भरणे यांच्या माध्यमातून मिशन मोडवर काम सुरु केले आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूरातील युवा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडे खेचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चालविला आहे.

इतर पक्षातील नगरसेवकांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून सर्वाधिक विकास निधी देऊन त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी महिना दोन महिन्यात कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपातील काही नगरसेवक पालकमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी यावेळी कोणत्याही स्थितीत महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणायचीच आहे. त्यासाठी साम, दाम, दंड वापरण्याची तयारी आहे. तुम्ही फक्त जोमाने तयारी करा, असे फर्मानच पालकमंत्री भरणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचे दस्तरखुद्द राष्ट्रवादीचेच नेते सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here